वाघ्या मुरळींचे जगणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाघ्या मुरळींचे जगणे
वाघ्या मुरळींचे जगणे

वाघ्या मुरळींचे जगणे

sakal_logo
By

10901

वाघ्या मुरळी दारोदार वारी मागी...!
लोककलावंत म्हणून नोंदच नाही; प्रमाणपत्रं देणार कोण हाच प्रश्‍न?
संदीप खांडेकर : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २४ : ‘‘ग्रामपंचायतीच्या फेऱ्या मारल्या तरी रहिवासी दाखला मिळत नाही. जुनी कागदपत्रं शोधायची कुठं? आमची लोककलावंत म्हणून शासन दरबारी नोंदच नाही. घरच्या जागराणाला कोण प्रमाणपत्रं देईल काय? तरीबी शासन म्हणतंय तुम्ही कार्यक्रम केलेलं प्रुफ दाखवा. वारी मागून जगण्याशिवाय पर्याय न्हाई आमच्यासमोर. वाघ्या मुरळी भंडारा उधळी असं आम्ही गाण्यात म्हणतोय. आता वाघ्या मुरळी दारोदारी वारी मागी, असंच आमचं जगणं झालंय,’’ वाघ्या मुरळी परिषदेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अंगद चौधरी (वाघे) सांगत होते. वाघ्या मुरळींचे जगणे महाग होऊन बसल्याचे हे चित्र. खंडोबाचा जागर, तुळजाभवानीचा गोंधळ व देव-देवतांच्या मूर्तीचे कार्यक्रमाशिवाय त्यांना रोजीरोटीचा मार्ग राहिलेला नाही.
राज्यासह कोल्हापूर जिल्ह्यात वाघ्या-मुरळीची परंपरा आजही टिकली आहे. मुरळीच्या हातातील घंटी अन् वाघ्याच्या हातातील दिमडी, लोककलांच्या सादरीकरणात आजही भाव खातात. खंडोबारायाच्या गुणगानात वाघ्या-मुरळी तल्लीन होऊन लोककलेचा बाज दाखवतात. ज्येष्ठ शाहीर असोत, की तमाशा कलावंत त्यांना कलाकार म्हणून निवृत्ती वेतन मिळते. त्यांना कार्यक्रमाची प्रमाणपत्रे मिळतात. वाघ्या-मुरळींना कोण देणार प्रमाणपत्र अन् निवृत्ती वेतन?, ही वाघ्या-मुरळीचे काम करणाऱ्यांची खंत आहे.
ज्येष्ठ वाघ्या-मुरळींना निवृत्ती वेतन मिळावे, यासाठीचा लढा १९९० पासून सुरू आहे. त्यासाठी वेळोवेळी शासन दरबारी निवेदने दिली आहेत. त्याची दखल मात्र घेतले गेलेली नाही.
---------------------
चौकट
पाच हजार निवृत्ती वेतन हवे
हाताच्या बोटावर मोजण्याइतपत ज्येष्ठ वाघ्या-मुरळींना निवृत्ती वेतन मिळते. तेही १५०० ते २०० रूपये इतके तुटपूंजे. पन्नाशी ओलांडलेल्या वाघ्या-मुरळींची संख्या अधिक आहे. मुरळीचे काम करणाऱ्या महिलांची आर्थिक स्थिती चांगली नाही. त्या कार्यक्रमात येऊन मुरळीचे काम शिकतात. त्यांना जागरण, गोंधळाच्या कार्यक्रमावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे ज्येष्ठ वाघ्या-मुरळींना महिन्याकाठी किमान पाच हजार रूपये निवृत्ती मिळायला हवे, असे चौधरी सांगतात.
-----------------
दृष्टीक्षेपात
- राज्यात वाघ्या मुरळींची संख्या - सुमारे ६० हजार
- कोल्हापूर जिल्ह्यातील संख्या - नोंदणीकृत ५००
- वर्षाकाठी राज्यातील जागणांचे कार्यक्रम : सुमारे ३५००
-------------------
मागण्या अशा
- उदरनिवार्हासाठी विशेष निधी द्यावा
- मुला-मुलींच्या शिक्षणाचा खर्च शासनाने करावा
- वाघ्या मुरळी लोककलेस शासन मान्यता मिळावी
- कलावंतांच्या निवासासाठी जमीन/घरासाठी विशेष योजना व्हावी
- ज्येष्ठ कलावंतांना निवृत्ती वेतन मिळावे
--------------------
वारी मागणे म्हणजे काय..?
वारी मागणेबाबत लोककला व लोकसाहित्याचे अभ्यासक प्रा. डॉ. विश्‍वनाथ शिंदे म्हणाले, ‘‘वाघ्या-मुरळी यांचा वारी मागण्याचा मुख्य वार रविवार. ते सोमवारीही वारी मागतात. घरातील कोरडा शिधा ते घेतात. ज्यात ते प्रामुख्याने तांदूळ घेतात. परिस्थितीनुसार घरातील अन्य अन्नधान्याचाही स्वीकार करतात. आजही शहरासह ग्रामीण भागात वारी मागण्याची प्रथा सुरू आहे.’’