रंकाळ्यातील पाण्याचे घेतले नमुने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रंकाळ्यातील पाण्याचे घेतले नमुने
रंकाळ्यातील पाण्याचे घेतले नमुने

रंकाळ्यातील पाण्याचे घेतले नमुने

sakal_logo
By

रंकाळ्यातील पाण्याचे घेतले नमुने
जलप्रदूषणाचा प्रश्‍न; ‘प्रदूषण नियंत्रण’कडून कार्यवाही
कोल्हापूर, ता. २४ ः रंकाळा तलावातील जलप्रदूषणाबाबत केलेल्या तक्रारीनुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी आज सायंकाळी रंकाळ्यातील पाच विविध ठिकाणच्या पाण्याचे नमुने घेतले. तसेच प्रदूषण होणाऱ्या ठिकाणांची माहितीही घेतली.
रंकाळा तलावातील प्रदूषण रोखण्याऐवजी महापालिका सुशोभीकरणाच्या नावाखाली व्यापारीकरण करत आहे. तलावात कोणत्याही प्रकारचे बांधकाम करू नये वा काही सुविधा निर्माण करू नयेत म्हणून प्रहार प्रतिष्ठानच्या नेतृत्वाखाली रंकाळाप्रेमींनी मंगळवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी जगन्नाथ साळुंखे यांना निवेदन दिले होते. तसेच प्रदूषणाबाबत महापालिकेचे जल अभियंता, शहर अभियंता तसेच पर्यावरण अभियंत्यांवर फौजदारी दाखल करावी अशी मागणीही केली होती. त्यावेळी साळुंखे यांनी दोन दिवसात रंकाळा तलावाची पाहणी करून नोटीस काढण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार आज डॉ. जाधव यांनी तलावातील विविध ठिकाणच्या पाण्याचे नमुने घेतले. त्यामध्ये सरनाईक कॉलनीतून मिसळणाऱ्या सांडपाण्याच्या ठिकाणी, देशमुख हॉलजवळील नाल्याजवळील, शाम सोसायटीजवळील, परताळ्याजवळील तसेच सांडव्याच्या ठिकाणाचा समावेश आहे. हे नमुने प्रयोगशाळेतून तपासून घेऊन त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.यावेळी प्रहारचे अमर जाधव, आनंदराव चौगले, चंद्रकांत खोंद्रे, चंद्रकांत पोवार आदी रंकाळाप्रेमी उपस्थित होते.