पोर्तुगाल विजयी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोर्तुगाल विजयी
पोर्तुगाल विजयी

पोर्तुगाल विजयी

sakal_logo
By

64534
रोनाल्डोच्या विक्रमासह पोर्तुगाल विजयी
घानावर ३-२ फरकाने मात, सर्व गोल उत्तरार्धात

दोहा, ता. २४ ः ‘सुपरस्टार’ ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील विक्रमी गोलने प्रेरित झालेल्या पोर्तुगालने उत्तरार्धात आक्रमक खेळ केला आणि घानावर ३-२ फरकाने विजय नोंदविला. सलग पाच विश्वकरंडक स्पर्धेत गोल करणारा रोनाल्डो पहिला पुरुष फुटबॉलपटू बनला.
‘ह’ गटातील सामना गुरुवारी रात्री ‘स्टेडियम ९७४’वर झाला. ६५व्या मिनिटास पेनल्टी फटक्यावर अचूक नेम साधत रोनाल्डोने संघाला आघाडी मिळवून दिली. घानाचा कर्णधार अँड्र्यू अयू याने ७३व्या मिनिटास संघाला बरोबरी साधून दिली; नंतर मात्र पोर्तुगालने जबरदस्त प्रतिहल्ला चढवत दोन मिनिटांत दोन गोल केले. जुवाव फेलिक्सने ७८ व्या, तर बदली खेळाडू राफेल लियाव याने ८० व्या मिनिटास गोल नोंदवून पोर्तुगीज संघाची आघाडी जास्तच भक्कम केली. ८९व्या मिनिटाला बदली खेळाडू ओस्मान बुकारी याने गोल केल्यामुळे घानाची पिछाडी २-३ अशी कमी झाली व सामन्यातील रंगत आणखीनच वाढली. गोलरक्षक दिएगो कॉस्ता याची चूक महागात न पडल्यामुळे पोर्तुगालने आघाडी टिकवत विजयाचे पूर्ण तीन गुण वसूल केले. गटसाखळीतील पुढील फेरीत पोर्तुगालसमोर उरुग्वेचे आव्हान असेल, तर घाना दक्षिण कोरियाविरुद्ध खेळेल.
विश्वकरंडक स्पर्धा सुरू होत असताना मँचेस्टर युनायटेड संघासोबतच्या वादामुळे ख्रिस्तियानो रोनाल्डो चर्चेत राहिला. घानाविरुद्धच्या लढतीपूर्वी पोर्तुगालच्या ३७ वर्षीय कर्णधाराने इंग्लिश क्लब सोडला. त्यामुळे तो देशातर्फे खेळताना व्यावसायिक क्लबविना होता. पोर्तुगीज कर्णधाराने पाठीराख्यांना निराश केले नाही.

रोनाल्डोची विक्रमी पेनल्टी किक
तासाभरातील खेळानंतर पोर्तुगालला पेनल्टी फटका मिळाला. यावेळी रोनाल्डोने सारा अनुभव पणाला लावत प्रतिस्पर्धी गोलरक्षक लॉरेन्स अती याला संधीच दिली नाही. २००६ पासून प्रत्येक विश्वकरंडक स्पर्धेत गोल करणारा तो जगातील पहिला फुटबॉलपटू ठरला.

रोनाल्डोचा गोल ठरला अवैध
सामन्याच्या ३१व्या मिनिटास रोनाल्डोने गोल केला होता, परंतु त्याने प्रतिस्पर्धी खेळाडू फाऊल केल्यामुळे रेफरीने हा गोल मान्य केला नाही. त्यापूर्वी १३व्या मिनिटास रोनाल्डोच्या हेडिंगमध्ये भेदकता दिसली नाही.

दृष्टिक्षेपात...
- २०१४ सालच्या विश्वकरंडक स्पर्धेत पोर्तुगालने घानावर २-१ असा विजय नोंदविला होता, तेव्हाही पोर्तुगालचे ख्रिस्तियानो रोनाल्डोने, तर घानाचे अँड्र्यू अयू याच्याकडे नेतृत्व
- पोर्तुगालची एकदंरीत ८ वी, तर सलग ६ वी विश्वकरंडक स्पर्धा, कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो ५ व्यांदा विश्वकरंडात सहभागी
- विश्वकरंडक स्पर्धेत ६ गोल केलेल्या असामोआ ग्यान याच्याविना घानाची पहिलीच स्पर्धा