महिला पैलवान नोकरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिला पैलवान नोकरी
महिला पैलवान नोकरी

महिला पैलवान नोकरी

sakal_logo
By

10917, 10915
-----------
नोकरीच मिळत नसेल,
तर कुस्तीत का यायचे?

यशस्वी महिला कुस्तीपटूंचा सवाल

संदीप खांडेकर : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २५ : पैलवान नंदिनी साळोखे वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतील सुवर्ण, तर स्वाती शिंदे कनिष्ठ आशियाई स्पर्धेत कास्यपदकाची मानकरी. दोघींनी प्रतिकूल परिस्थिीतून कुस्तीत स्वत:ला घडविले. रेल्वे बोर्डात स्पोर्टस कोट्यातून नोकरीसाठी सातत्याने दोघींनी पाठपुरावा केला. थेट मंत्र्यांना भेटून निवेदन दिले. तरीही त्यांना नोकरी मिळण्याची अद्याप शाश्‍वती नाही. पैलवान होऊन नोकरीच मिळत नसेल, तर कुस्ती करायची कशी, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.
नंदिनी तिसरीला असताना तिचे वडील बाजीराव यांचे निधन झाले. तिला पैलवान करण्याचा ध्यास आई सरिता यांनी सोडला नाही. मुरगूड येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक कुस्ती संकुलात तिने कुस्तीचा कसून सराव सुरू केला. प्रशिक्षक दादा लवटे यांच्या मार्गदर्शनाखाली डावपेच गिरवले. तालुका, जिल्हा, राज्यस्तरावरील शालेय कुस्ती स्पर्धेत छाप पाडली. पदके मिळवून गावाचा लौकिक वाढवला. थेट राष्ट्रीय स्तरावर धडक मारत तिने २०२१ला वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले. तब्बल तेवीस वर्षांनंतर महाराष्ट्राला महिलांत पहिले पदक मिळविण्याचा तिने मान मिळविला. इटलीत झालेल्या जागतिक मानांकन व फिनलंडमध्ये झालेल्या कनिष्ठ जागतिक स्पर्धेच चौथा क्रमांक मिळविला. आजवर तिने राज्यस्तरावर सुमारे पस्तीस सुवर्ण, तर राष्ट्रीय स्पर्धेतील पदकांचा आकडा सुमारे पंचवीस आहे.
स्वाती शेतकरी कुटुंबातील असून, वडिल संजय यांचा अपघातात एक पाय निकामी झाला आहे. तिने जिद्द न सोडता कुस्तीत लौकिक मिळवला आहे. ती
महाराष्ट्रातील एकमेव महिला कुस्तीपटू आहे, जिने वरिष्ठ आशियाई स्पर्धेत चौथा क्रमांक मिळविला आहे. ज्युनिअर आशियाई कुस्ती स्पर्धेत तिला कास्यपदक आहे. या दोघींना रेल्वे बोर्डाच्या स्पोर्टस् कोट्यातील नियमानुसार नोकरी मिळू शकते, यासाठी भारतीय कुस्ती महासंघाने बोर्डाकडे प्रस्ताव पाठवला होता. दोन-तीन महिन्यांत त्यावर काहीच प्रतिक्रिया आली नाही. अखेर श्री. लवटे बोर्डाच्या अधिकाऱ्यांना जाऊन भेटले. त्यानंतर आठ ते दहा फाईल करून रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचीही त्यांनी भेट घेतली. श्री. दानवे यांनी मध्य रेल्वेच्या सरव्यवस्थापकांशी संपर्क साधून कार्यवाही करण्यास सांगितले. पुढे कोणत्याच हालचाली झाल्या नाहीत.

चौकट
वयाच्या अटीमुळे प्रश्‍नचिन्ह
नंदिनी अर्जुनननगर येथील देवचंद कॉलेजमध्ये एम. ए. द्वितीय, तर स्वाती एम. ए.च्या पहिल्या वर्षात शिकते. नंदिनीचे वय सव्वीस, तर स्वातीचे पंचवीस आहे. रेल्वे बोर्डातील नोकरीसाठी किमान पंचवीस वयाची अट आहे. त्यामुळे दोघींसमोर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

कोट
मध्य व पश्‍चिम रेल्वेकडून महिलांचा संघ पाठवला जात नसल्याचे कारण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांना कुस्ती हा वैयक्तिक खेळ असल्याचे सांगावे लागले. त्यासाठी खाशाबा जाधव यांचे उदाहरण द्यावे लागले. महिला पैलवानांना नोकरी मिळत नसेल, तर त्या कुस्तीत क्षेत्रात येतील का, हाच प्रश्‍न आहे.
- दादा लवटे, कुस्ती प्रशिक्षक