आयजीएममध्ये पुरुष नसबंदी पंधरवडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आयजीएममध्ये पुरुष नसबंदी पंधरवडा
आयजीएममध्ये पुरुष नसबंदी पंधरवडा

आयजीएममध्ये पुरुष नसबंदी पंधरवडा

sakal_logo
By

आयजीएममध्ये पुरुष नसबंदी पंधरवडा
इचलकरंजी, ता. २५ : आयजीएम रुग्णालयामध्ये पुरुष नसबंदी पंधरवड्याचे आयोजन केले आहे. नसबंदीबाबत असलेले गैरसमज तसेच पुरुष नसबंदी मोहीम यशस्वी होण्यासाठी शहरातील आरोग्य उपकेंद्राची भूमिका याची माहिती रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. दिलीप वाडकर यांनी दिली.
कुटुंब नियोजनामध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांचा सहभाग अधिक असतो. पुरुषप्रधान संस्कृती व नसबंदीबाबत पसरलेले गैरसमज यास कारणीभूत आहेत. वाढती लोकसंख्या पाहता पुरुषांनीही नसबंदी करून कुटुंब नियोजनामध्ये पुढाकार घ्यावा, असे आवाहन रुग्णालयातर्फे केले आहे. देशाची लोकसंख्या नियंत्रणासाठी शासनाने कठोर पावले उचलत तीन अपत्य असणाऱ्या कुटुंबांवर काही निर्बंधही लावले आहेत. कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी महिलांना ३०० ते ६०० रुपये, तर पुरुषांना ११०० रुपये अनुदानही देण्यात येते. तसेच ही शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात येते; मात्र २०१९-२० मध्ये कोरोनामुळे देशात कुटुंब नियोजन योजना काही अंशी खंडित झाली होती.
शहरातील आयजीएम रुग्णालयामध्ये सर्व शस्त्रक्रिया स्थगित केल्या होत्या. त्याचा फटका शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या कुटुंब नियोजन योजनेला बसला होता. पुरुषांमध्ये नसबंदीबाबत प्रबोधन व्हावे व त्यांचेही कुटुंब नियोजनामध्ये सहकार्य असावे यासाठी पुरुष नसबंदी पंधरवडा सुरू केल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून स्पष्ट केले. यावेळी डॉ. महेश महाडिक, डॉ. संदीप मिरजकर, क्रांती देशमुख, डॉ. दिनेश चव्हाण आदी उपस्थित होते.
--------
पुरुषी अहंकारामुळे महिलांची शस्त्रक्रिया
कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेमध्ये महिलांबरोबर पुरुषांचीही नसबंदी करण्यात येते; पण पुरुषांचे प्रमाण अत्यल्प आहे. २०२२ मध्ये हातकणंगले तालुक्यामधील केवळ दोघांची नसबंदी केली आहे. आयजीएम रुग्णालयामध्ये २०१९ पासून बोटावर मोजण्याइतक्याच पुरुषांनी नसबंदी केल्याची नोंद आहे. पुरुषी अहंकारामुळे कुटुंब नियोजनाकरीता महिलांना पुढे करण्यात येत असल्याचे दिसून येते.