चर्चा, निर्णय प्रोसिडींगपुरते नको | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चर्चा, निर्णय प्रोसिडींगपुरते नको
चर्चा, निर्णय प्रोसिडींगपुरते नको

चर्चा, निर्णय प्रोसिडींगपुरते नको

sakal_logo
By

gad2510.jpg
64643
गडहिंग्लज : शहरातील फेरीवाल्यांच्या नियोजनासाठी झालेल्या बैठकीप्रसंगी बाबासाहेब वाघमोडे, दिनेश पारगे, स्वरुप खारगे व फेरीवाले, व्यापारी.
------------------------------------------------------
चर्चा, निर्णय प्रोसिडिंगपुरते नको
प्रांतांकडून कानउघाडणी : फेरीवाले पुनर्वसन निर्णयांच्या अंमलबजावणीचे आदेश
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २५ : शहरातील मुख्य मार्गासह लक्ष्मी रोडवरील ढकल गाडावरून फळे आणि विविध साहित्य विक्रेत्यांच्या पुनर्वसनाबाबत यापूर्वीही बैठक झाली आहे. त्यावेळी चर्चा करूनच निर्णय घेतले आहेत. त्याची अंमलबजावणी आहे. आजच्या बैठकीत पुन्हा तीच-तीच चर्चा नको. मागील निर्णयांच्याच अंमलबजावणीकडेच लक्ष द्या. चर्चा आणि निर्णय केवळ प्रोसिडिंगपुरते ठेवू नका, अशी सक्त सूचना प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी पालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाला आज दिल्या.
मार्गशीर्ष महिन्यासह इतर सणावारावेळी लक्ष्मी रोडवर साधी दुचाकीही रस्त्यावरून जाणे मुश्कील होते. इतर दुकानदारांच्या व्यवसायावरही परिणाम होत आहे. यामुळे फेरीवाल्यांचे नियोजन करण्याची मागणी चेंबर्स ऑफ कॉमर्सने केली होती. त्यासाठी आज मुख्याधिकारी स्वरुप खारगे यांच्या कक्षात बैठक झाली. यावेळी तहसीलदार दिनेश पारगे उपस्थित होते.
मार्गशीर्ष महिन्यात फळांच्या ढकलगाड्या बुधवारी ते शुक्रवार सलग लक्ष्मी रोडच्या मध्येच असतात. इतर सणावारातही हीच परिस्थिती असते. रस्त्याच्या दुतर्फा पालिकेने जागा आखून दिली आहे. दोन्ही बाजूंनी विक्रेते बसल्यानंतर फेरीवाले मध्येच आपल्या ढकलगाड्यांची रांग लावतात. हे चुकीचे असल्याने केवळ सणावारात रस्त्याच्या दुतर्फा ठरवलेल्या जागेत बसूनच फळांची विक्री करावी, अशी सूचना करण्यात आली. इतर दिवशी त्यांच्यासाठी अन्यत्र जागा निश्‍चित करून पुनर्वसन करण्याचे सूचित केले.
बैठकीतील चर्चेचे गुऱ्‍हाळ वाढतच चालल्याने प्रांताधिकारी श्री. वाघमोडे म्हणाले, ‘चर्चा थांबवा. मुळात या बैठकीत चर्चा न होता अंमलबजावणीची कार्यवाही ठरवणे आवश्यक आहे. यापूर्वी झालेल्या बैठकीत सर्व नियोजन केलेले आहे. त्याची अंमलबजावणी महत्त्वाची आहे. मागील बैठकीतील निर्णयांचा किती अंमल केला, हे अतिक्रमण नियंत्रण विभागाने तपासून पाहावे. फेरीवाल्यांसह इतर अतिक्रमण नियंत्रणाची संपूर्ण जबाबदारी पालिकेची आहे. झालेल्या निर्णयांची अंमलबजावणीच होत नसेल तर कोणाला नावे ठेवायची. दोन ते तीन दिवस तोंडी, लेखी सूचना द्या. त्यानंतर मागच्या बैठकीत ठरल्यानुसार प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू करा.’ यावेळी राजेश बोरगावे, रामदास कुराडे, सिद्धार्थ बन्ने, दादू पाटील, अशोक शिंदे, आशिष हिडदुग्गी, दीपक वेर्णेकर, किरण कापसे यांनी सूचना मांडल्या.
---------------------
सोमवारपासून तीन दिवस फेरीवाल्यांसह विक्रेत्यांना तोंडी व लेखी सूचना दिली जाईल. त्यानंतर १ डिसेंबरपासून प्रत्यक्ष कडक अंमलबजावणीला सुरुवात होईल.
- स्वरुप खारगे, मुख्याधिकारी
-----------------
* काय झाले निर्णय
- केवळ सणावारातच लक्ष्मी रोडवर दुतर्फा बसून फळांची विक्री
- रस्त्याच्या मधोमध हातगाड्यांची रांग लावायची नाही
- इतरवेळी दीक्षित बोळ, मुलींच्या हायस्कूलजवळ फेरीवाले थांबतील
- इतर ठिकाणच्या भाजी विक्रेत्यांनी भाजी मंडईतच जावे
- दुकानदारांनी रस्त्यावर लावलेले फलक काढावेत
- शहरात विविध ठिकाणी दुकानदारांकडून झालेली अतिक्रमणे हटवणार