इचल : सर्वोच्च न्यायालय सुनावणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचल : सर्वोच्च न्यायालय सुनावणी
इचल : सर्वोच्च न्यायालय सुनावणी

इचल : सर्वोच्च न्यायालय सुनावणी

sakal_logo
By

गायरानातील अतिक्रमणप्रश्नी सर्वोच्च
न्यायालयात २ डिसेंबरला सुनावणी

आमदार प्रकाश आवाडे यांची माहिती

इचलकरंजी, ता. २५ ः गायरानातील अतिक्रमण निष्कासित करण्याच्या आदेशाला स्थगिती मिळावी, यासाठी आमदार प्रकाश आवाडे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर २ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. राज्यातील सर्वच गोरगरीब भूमिहीन लोकांसाठी राज्यातून पहिलीच याचिका दाखल केली असून त्यातून गोरगरिबांना निश्‍चितपणे दिलासा मिळेल, असा विश्‍वास आमदार आवाडे व्यक्त केला आहे.
उच्च न्यायालयाने गायरानातील अतिक्रमणे निष्कासित करण्याचा नुकताच आदेश दिला आहे. त्यानुसार प्रशासनाकडून प्रक्रिया सुरू झाली असून महसूल विभागाकडून अतिक्रमण हटवण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. या आदेशामुळे हजारो कुटुंबे उघड्यावर पडणार असल्याने अतिक्रमण काढण्यास विरोध होत आहे. त्याच अनुषंगाने गायरानातील अतिक्रमणधारकांची बाजू घेत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेच्या माध्यमातून प्रशासनाचा आंधळा कारभार सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला जाणार आहे. ज्या भूमिहीन लोकांना सन १९७२ व सन १९७५ साली शासनामार्फत रितसर सनद देत त्यांना गायरानमधील बेघर प्लॉटचे वाटप केले आहे, अशांचे अतिक्रमण निष्कासित करण्याच्या नोटिसा इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील कबनूर, कोरोची गावातील सनदधारकांनाही लागू केल्या आहेत. हा प्रकार अवमान करणारा आहे. सन २०११ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ काढून प्रशासन चुकीच्या पद्धतीने गोरगरीब जनतेला त्रास देत आहे. पण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व विद्यमान सरकार गोरगरीब जनतेच्या सोबत असल्याचे आमदार आवाडे यांनी सांगितले.
सुनावणीदरम्यान शासनाच्या वतीने अतिक्रमणधारकांच्या बाजूने प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे एकाही गरीब कुटुंबावर बेघर होण्याची वेळ आम्ही येऊ देणार नाही. सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेत अनेक मुद्दे घातले असून सर्वोच्च न्यायालय सर्व मुद्यांचा विचार करून ३१ डिसेंबरपर्यंत राज्यातील सर्व अतिक्रमणे हटविण्याच्या उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशास स्थगिती देईल, असा विश्‍वास आमदार आवाडे यांनी व्यक्त केला.