यंत्रमाग उद्योगाला येणार ‘अच्छे दिन’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यंत्रमाग उद्योगाला येणार ‘अच्छे दिन’
यंत्रमाग उद्योगाला येणार ‘अच्छे दिन’

यंत्रमाग उद्योगाला येणार ‘अच्छे दिन’

sakal_logo
By

यंत्रमाग उद्योगाला येणार ‘अच्छे दिन’
निर्बंधमुक्त विवाहामुळे मुहूर्त कापडाला मागणी वाढणार
इचलकरंजी, ता. २५ ः सतत अस्थिरतेच्या वातावरणात हेलखावे खात असलेल्या यंत्रमाग उद्योगाला ‘अच्छे दिन’ची चाहूल लागली आहे. हळूहळू कापडाला मागणी येत आहे. यामध्ये डिसेंबरच्या मध्यानंतर मागणीला अधिक गती येण्याची शक्यता आहे. यंदा विवाहाचे मुहूर्त मोठ्या प्रमाणात असून पूर्वीप्रमाणे निर्बंधमुक्त धुमधडाक्यात विवाह सोहळे साजरे होणार आहेत. साहजिकच कापडाला मागणी वाढणार आहे. परिणामी, पुढील किमान चार ते पाच महिने वस्त्रोद्योगात तेजीचे वातावरण येईल, अशी आशा आहे.
काही वर्षापासून यंत्रमाग उद्योग अडचणीतून जात आहे. सूत दरातील चढ-उतारामुळे यंत्रमाग उद्योगात प्रचंड अस्थिरता निर्माण होत आहे. मुळात कापसाचा समावेश कमोडीटी मार्केटमध्ये केला आहे. त्यामुळे सतत दरात बदल होत असल्याने वस्त्रोद्योगाची साखळी उत्पादक घटकांपेक्षा व्यापारी वर्गाच्या हातात आहे. त्यातच कोरोनामुळे कापडाची मागणी घटली होती. व्यापाऱ्यांकडून दोन-तीन वर्षांत खूपच कमी प्रमाणात कापडाची खरेदी केली. कापडाचे उत्पादन वाढल्यामुळे दरात घसरण झाली. याचा फटका बसत असल्यामुळे अनेक यंत्रमाग उद्योजकांनी कापड उत्पादन बंद ठेवले. चार महिने तर कापड मार्केट पूर्णतः थंड आहे.
मात्र आता पुन्हा कापडाला मागणी येईल, अशी आशा निर्माण झाली. अद्यापही आठ दिवस तेजी व आठ दिवस मंदी अशा परिस्थितीत यंत्रमाग उद्योग हेलखावे खात आहे. त्याला स्‍थिरता आलेली नाही. पण पुढील काळ यंत्रमाग उद्योगासाठी दिलासादायक असेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. डिसेंबरच्या मध्यानंतर कापडाला चांगली मागणी येण्यास सुरुवात होईल, अशी अपेक्षा आहे. त्यानंतर पुढील चार ते पाच महिने कापड मार्केट तेजीत राहील, असे सांगीतले जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा यंत्रमागाच्या चाकांना अधिक गती येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
-----------------
राज्य शासनाकडून अपेक्षा वाढल्या
वस्त्रोद्योगाला नव संजीवनी देण्यासाठी राज्य शासनाकडून नवीन धोरण निश्‍चित केले जाणार आहे. त्यासाठी आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर व वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांची निवड केली आहे. तिघेही वस्त्रोद्योगातील जाणकार आहेत. त्यांचा फायदा नक्कीच नवीन वस्त्रोद्योग धोरण ठरवताना होईल, अशी आशा आहे. यंत्रमागाच्या आधुनिकीकरणावर भर देतानाच साधे यंत्रमागही टिकले पाहिजेत, असे सर्वसाधारण धोरण असणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने राज्य शासनाकडून या उद्योगाच्या मोठ्या अपेक्षा वाढल्या आहेत.