
चंद्रकांत पाटगावकर स्मृतिदिनी व्याख्यान
64678
कोल्हापूर : स्वातंत्र्य सैनिक प्रा. चंद्रकांत पाटगावकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमात बोलताना प्रा. डॉ. शरद बाविस्कर.
‘शिक्षणापासून लोकांना परावृत्त
करणारी यंत्रणा देशात कार्यरत’
कोल्हापूर, ता. २५ : ‘‘परावलंबीत्वापासून स्वावलंबनाकडे जो गतीशील प्रवास असतो, तो शिक्षणाकडे जातो. शिक्षण आणि लोकशाही एकत्रित नांदत असते; मात्र शिक्षणापासून लोकांना परावृत्त करणारी एक यंत्रणा सध्या देशात कार्यरत आहे. तशाच पद्धतीने लोकशाही संपविण्यासाठीही अशी यंत्रणा तयार झाली आहे. यासाठी चिकित्सक, चौकसपणे, बुद्धिचा वापर करुन नागरी समाजाची निर्मिती झाली पाहिजे,’’ असे ‘जेएनयू’मधील प्रा. डॉ. शरद बाविस्कर यांनी सांगितले.
स्वातंत्र्य सैनिक प्रा. चंद्रकांत पाटगावकर यांच्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त आज शाहू स्मारक भवनमध्ये कार्यक्रम झाला. ‘शिक्षण आणि लोकशाही’ यावर डॉ. बाविस्कर यांचे व्याख्यान झाले. डॉ. राजन गवस अध्यक्षस्थानी होते. दलितमित्र बापूसाहेब पाटील ग्रंथालयाने आयोजन केले.
डॉ. बाविस्कर म्हणाले, ‘‘लोकशाही मानणारे आणि लोकशाहीचा तिरस्कार करणारे असे दोन गट समाजात असतात. सध्या लोकशाहीचा तिरस्कार करणारा एक गट सत्तेत बसला आहे. लोकशाही संपविण्यासाठी या लोकांकडून प्रयत्न सुरु आहेत. याकरीता जो काही तुम्हाला वेळ मिळत आहे, तो सार्वजनिक कल्याणासाठी दिला पाहिजे.’’
राणिता चौगुले यांनी स्वागत केले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर यांनी प्रास्ताविक केले. अनुराधा मेहता यांनी पाहूण्यांची ओळख करुन दिली. अलका देवलापूरकर यांनी आभार मानले.