गड-वर्धापन लेख-16 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गड-वर्धापन लेख-16
गड-वर्धापन लेख-16

गड-वर्धापन लेख-16

sakal_logo
By

65130
दयानंद पाटील

महिला सक्षमीकरणातून
ग्रामविकासाचा मार्ग प्रशस्त
लीड
भारतीय समाज संरचनेत ग्रामीण भागास अत्यंत महत्त्व आहे. ७४ टक्क्यांपेक्षा जास्त समुदाय ग्रामीण भागात राहत असल्याने त्याचे महत्त्व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यापासून अनेक विचारवंतांनी व समाज सुधारकांनी अधोरेखित केले आहे. आपला देश आणि पर्यायाने आपला ग्रामीण समाज हा कृषिप्रधान व गृहउद्योगाशी निगडित असलेला पाहावयास मिळतो. याच ग्रामीण समाजाचा अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे महिला विकास. ग्रामविकास म्हणजे गावांचा फक्त भौतिक विकास न समजता तेथील गरीब व वंचित घटकांना त्यांच्या प्राथमिक गरजांची परिपूर्ती, सामाजिक व आर्थिक जीवनमान उंचावणे अशा अर्थाने समजणे योग्य ठरेल. ग्रामीण महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनस्तरावरून कार्यक्रम राबविले गेले व आजही राबविले जातात. त्यामध्ये प्रामुख्याने त्यांचे आरोग्य, शिक्षण, स्त्री-पुरुष समानता, स्त्रीचे हक्क व अधिकार, ग्रामविकासामध्ये महिलांचा सहभाग वाढविणे, निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांचा सहभाग या घटकावर भर दिल्याचे दिसून येते. महिला सक्षमीकरण हा ग्रामविकासातील मोठा टप्पा ठरेल.
- दयानंद पाटील,
तालुका अभियान व्यवस्थापक, गडहिंग्लज
-------------------
महिला सक्षमीकरणामध्ये महिलांच्या बचत गट चळवळीचा मोठा वाटा आहे. स्त्रीने स्वत:च्या क्षमतांची ओळख करून त्या क्षमतांचा विकास करण्यासाठी निर्णय प्रक्रियेत सहभागी होऊन आत्मनिर्भरतेने व आत्मविश्‍वासाने काम करणे म्हणजे महिला सक्षमीकरण होय. बचत गट चळवळीमध्ये हा हेतू साध्य होत आहे. आपल्या अडीअडचणीवेळी एकमेकांना बचतीतून आर्थिक सहकार्य करणे व स्वयंरोजगारांची शक्ती व आत्मविश्वास वाढविण्यासाठी परस्परांना सहकार्य करण्यासाठी तयार केलेल्या गटाला स्वयंसहायता गट म्हणता येईल. बचत गट किंवा बदललेल्या संकल्पनेनुसार स्वयंसहायता गट हा संघटनेचे छोटे प्रतीक आहे. ज्यांना समुदायस्तरीय संस्था असेही संबोधले जाते. ज्यात सामाजिक व आर्थिक गरजा भागविण्यावर भर दिला जातो.
स्वयंसहायता गटाच्या चळवळीची सुरुवात बांग्लादेशातून झाली. नोबेल पुरस्कार विजेते डॉ. मुहम्मद युनूस यांना बचत गटाच्या चळवळीचे जनक असे संबोधले जाते. बांग्लादेशमधील गरिबी आणि सामान्य जनतेच्या न भागणाऱ्या गरजा, सावकाराकडून होणारी पिळवणूक, आर्थिक समावेशनापासून वंचित कुटुंबे यापार्श्‍वभूमीवर डॉ. मुहम्मद युनूस यांनी महत्प्रयासाने राबविलेल्या बचत गटाच्या प्रयोगाला अभूतपूर्व यश मिळाले. तेथे महिलांची ग्रामीण बँक स्थापन झाली. भारतातील एका लहान राज्याइतका बांग्लादेश आहे. त्यामध्ये या बँकेच्या १३४३ शाखा व १२१२४ कर्मचारी आहेत. ४२ लाख कर्जदार असून, आजपर्यंत २२२.०९ अब्ज म्हणजेच बांग्लादेशच्या चलनाइतके कर्ज वाटप केले आहे. महिलांचा वाढलेला आत्मविश्वास, आपणही पुरुषांच्या बरोबरीने आर्थिक व्यवहार करू शकतो, ही तयार झालेली भावना व पर्यायाने निर्णय प्रक्रियेमध्ये झालेला महिलांचा समावेश यातून प्रेरणा घेऊन भारताने स्वयंसहायता गटाची योजना सुरू केली. भारतामध्ये बचत गटाची चळवळ ‘म्हैसूर रिसेटलमेंट अँड डेव्हलपमेन्ट एजन्सी (मायराडा)’ या संस्थेने सुरू केली. सामूहिक सबलीकरणातून महिला सक्षमीकरण व महिला उद्योगातून सामूहिक दारिद्र्यनिर्मूलन हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवला.

महिलांचे आत्मबळ वाढविणे
महाराष्ट्रात महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), चैतन्य (पुणे), ज्ञान प्रबोधिनी (पुणे), संपूर्ण बांबू केंद्र (अमरावती), आम्ही आमच्या आरोग्यासाठी (गडचिरोली), माता व बालक उत्कर्ष प्रतिष्ठान, स्व-रूप वर्धिनी (पुणे), स्वामी विवेकानंद सेवाभावी संस्था यासारख्या अशासकीय संस्था काम करीत आहेत. केंद्र व राज्य शासनामार्फत ग्रामीण भागासाठी जिल्हा परिषदाअंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या स्वतंत्र विभागाची स्थापना करून त्या मार्फत बचत गटांसाठीच्या योजना राबविण्यात आल्या. सन १९७८ मध्ये एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, सन १९९९ मध्ये स्वर्णजयंती ग्रामस्वरोजगार योजना व सन २०११ पासून सध्या सुरू असलेले महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) या माध्यमातून ही चळवळ जोमाने सुरू आहे. प्रत्येक गरिबाला गरिबीतून बाहेर पडण्याची तीव्र इच्छाशक्ती असते व क्षमताही असतात, त्या इच्छाशक्ती व क्षमतांना जागृत करून आंतरबाह्य आधार देणे हा अभियानाचा गाभा आहे. तसेच ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील किमान एका महिलेचा स्वयंसहायता गटामध्ये समावेश करणे, गरिबांच्या संस्था स्थापन करून त्यांचे बळकटीकरण करणे, शासन व बँकामार्फत अर्थसाहाय्य उपलब्ध करून देणे, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, गरिबीच्या बाहेर पडण्यास मदत करणे ही अभियानाची उद्दिष्ट्ये आहेत. यासोबतच सामाजिक समावेशन, आर्थिक समावेशन, वित्तीय समावेशन व उपजीविका या घटकावर अभियानाच्या माध्यमातून काम केले जात आहे.

संघटित ताकद उपयुक्त
संघटित ताकद व पारदर्शक सहकाराची प्रक्रिया जर एकत्र आली तर विविध प्रकारची उद्योजकता निर्माण होते आणि समाजाच्या प्रगतीला हातभार लावते. या चळवळीतून अनेक प्रकारचे उद्योग जन्माला आले आहेत. यातून ग्रामीण समाजातील महिलांच्या सक्षमीकरणास चालना मिळाली आहे. यामध्ये जिल्ह्यात दुग्ध व्यवसाय, बेकरी उत्पादने, शेवया, कुरडी, पापडी, सेंद्रिय गूळ काकवी, हळद, फुलशेती, सॅनिटरी नॅपकीन तयार करणे, मास्क तयार करणे, कापडी पिशवी, फाईल फोल्डर तयार करणे, केटरिंग सेवा पुरवणे, गारमेंट, विविध फ्लेवरचे जाम व सॉस तयार करणे, उपहारगृह चालविणे, अंगणवाडीत आहार पुरवणे असे विविध व्यवसाय सुरू आहेत.

बचत गट चळवळ समृद्ध व्हावी
सन २०१३-१४ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील बचत गटांचे पैसे वापरण्याचे प्रमाण वार्षिक सात हजार रुपये प्रती सदस्य इतके होते, ते सध्या १८ हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहे. हेच प्रमाण वार्षिक किमान एक लाख प्रती सदस्य इतके व्हायला हवे. यासोबतच बचत गटाच्या चळवळीमध्ये आणखी सुधारणा करण्यास वाव आहे. शासनस्तरावरून विविध टप्प्यांवर अनुदानाची मंजुरी, स्थानिक पातळीवर सकारात्मक प्रचार प्रसिद्धी, स्थानिक गरज व उपलब्धता ओळखून कौशल्य विकासासाठी व विविध व्यवसायांबाबत प्रशिक्षणाचे आयोजन, स्थानिक स्वराज संस्थाच्या पदाधिकाऱ्यांसाठीची प्रशिक्षणे व जबाबदाऱ्यांची जाणीव इत्यादी बाबींवर अजून काम करावे लागेल. ग्रामपंचायतींनी पुढाकार घेऊन १५ वा वित्त आयोगातून विशेष तरतूद करता येईल. ग्रामसंघांना कार्यालय उघडण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर दुकान गाळे उपलब्ध करून देता येईल. महिला स्वयंसाहाय्यता समूहांसाठी आऊटलेट/ दुकान गाळे/ स्टॉल देता येतील. गावस्तरावर उत्पादित मालासाठी विक्री केंद्र तयार झाल्यास स्थानिक बाजारपेठ उपलब्ध होईल. ग्रामपंचायतींना व इतर शासकीय कार्यालयांना आवश्यक कापडी पिशवी, फाईल फोल्डर, मास्क किंवा इतर आवश्यक वस्तू/ माल खरेदी समूहांकडून घेता येईल. गावस्तरावर सुरू असणाऱ्याया आठवडी बाजारांची करवसुली किंवा ग्रामपंचायतीची घरफाळा, पाणीपट्टी कर वसुलीसारखी कामे गट / ग्रामसंघामार्फत करता येतील. ग्रामविकासातील महिलांचे व महिला स्वयंसाहायता समूहांचे महत्त्व ओळखून या सर्व बाबींचा उहापोह होणे गरजेचे आहे.

चौकट...
विकास आराखड्याची जबाबदारी
बचत गट चळवळीमुळे महिलांमध्ये अनेक सकारात्मक बदल झालेले दिसून येत आहेत. महिलांचे हक्क व अधिकार, स्त्रीविषयक कायद्यांची माहिती होत आहे. वैचारिक दर्जा उंचावत असल्याचे दिसून येत असून, त्यांना सन्मान मिळत आहे. लघु-कुटीर उद्योगांच्या माध्यमातून कुटुंबाचे उत्पन्न वाढलेले आहे. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबनता आलेली आहे. अगदी स्वत:चे बँक खाते काढण्यापासून बँकेच्या व्यवहारांविषयी समज वाढत आहे. ग्रामसभेत आपल्या मागण्या मांडण्यापर्यंत सकारात्मकता बदल दिसून येत आहेत. तसेच गटातील महिलांवर नवी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ग्रामपंचायत स्तरावर ''ग्रामपंचायत विकास आराखडा'' तयार करीत असताना ''गाव-गरिबी निर्मूलन आराखडा'' तयार करण्याची व ग्रामपंचायतीस सादर करण्याची जबाबदारीही राज्य शासनाने गावस्तरावर कार्यरत गटावर व ग्रामसंघावर सोपविली आहे. याचाच अर्थ गावचा विकास आराखडा तयार करण्यात महिलांच्या ''मता''ला स्थान प्राप्त झालेले आहे.


चौकट...
दृष्टिक्षेपात जिल्ह्यातील बचत गट...
- बचत गट........................... २२,७४८
- बचत गटाशी जोडलेली कुटुंब.... २,२०,१५२
- ग्रामसंघ............................. ९७०
- प्रभाग संघ.......................... ४८


चौकट...
जिल्ह्यातील बचत गटांचा कर्जपुरवठा...
- सन २०२०-२१................... १०७ कोटी ६९ लाख रुपये
- सन २०२१-२२................... १६३ कोटी ३२ लाख रुपये
- सन २०२२-२३ (आजअखेर).. १२३ कोटी ८७ लाख रुपये