गायरानातील अतिक्रमणावर आठवड्यात हातोडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गायरानातील अतिक्रमणावर आठवड्यात हातोडा
गायरानातील अतिक्रमणावर आठवड्यात हातोडा

गायरानातील अतिक्रमणावर आठवड्यात हातोडा

sakal_logo
By

गायरानातील अतिक्रमणावर
आठवड्यात ‘हातोडा’

निवडणुका नसलेल्या ग्रामपंचायतीवर लक्ष

सदानंद पाटील ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २८ : न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्ह्यातील अतिक्रमण काढण्यासाठी प्रत्येक तालुक्यात काटेकोर नियोजन सुरू आहे. वाहनांची व्यवस्था, मोहिमेसाठी खर्चाची व्यवस्था, अतिक्रमण काढण्यासाठी प्राधान्यक्रम, कर्मचारी व्यवस्‍था केली आहे. त्यामुळे आठवड्यात गायरानातील अतिक्रमणावर ‘हातोडा’ पडेल असे चित्र आहे. दुसरीकडे सत्ताधारी व विरोधकांनीही अतिक्रमण मोहीम थांबवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितल्याने अतिक्रमणधारक सध्या निवांत आहेत. अतिक्रमणधारकांनी स्वतःहून अतिक्रमण न काढल्यानेही प्रशासन आणखी नेटाने कामाला लागले आहे.
राज्यातील गायरानात असणारी अतिक्रमणे काढण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. डिसेंबरअखेर ते काढले जाणार आहे. अतिक्रमण काढण्याची जबाबदारी प्रशासनावर सोपवली आहे. प्रांताधिकारी व गट विकास अधिकाऱ्यांकडून अतिक्रमण काढण्याचा आराखडा तयार केला जात आहे. प्रशासनाने नागरिकांना स्‍वत:हून अतिक्रमण काढण्याचे आवाहन केले होते. त्याला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. याबाबत २३ हजार लोकांना नोटिसा दिल्या होत्या. दररोज नोटिसीची संख्या वाढत आहे. साधारणपणे ३० हजार कुटुंबांना ही नोटीस लागू होईल, अशी शक्यता आहे.
अतिक्रमणे काढण्यासाठी आवश्यक व्यवस्‍था केली जात आहे. यामध्ये वीज बंद करण्याची जबाबदारी गावातील महावितरण कर्मचारी, पाणीपुरवठा बंद करण्यासाठी पाणीपुरवठा कर्मचारी, आरोग्याचा प्रश्‍‍न आला तर आरोग्य सेविका महिला व पुरुष, पोलिस, पंचनामा करण्यासाठी महसूलचे कर्मचारी अशी जबाबदारीची विभागणी केली आहे. पुढील तीन, चार दिवसातच ही मोहीम सुरू होईल, असे नियोजन केले आहे. स्‍वत:हून अतिक्रमण काढले नाही, तर सरकारी खर्चाने ते काढले जाणार आहे. त्याचा खर्च संबंधित अतिक्रमणधारकांकडून वसूल केला जाईल, असे सांगण्यात येत आहे.
ग्रामपंचायत निवडणुका असलेल्या गावात अतिक्रमण काढण्याची घाईगडबड न करता जेथे निवडणुका नाहीत, तेथे पहिल्यांदा अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवली जाणार आहे. निवडणुकीनंतर उर्वरित ग्रामपंचायतीत कारवाई केली जाईल.


चौकट
प्राधान्यक्रमाने अतिक्रमण निर्मूलन
प्राधान्यक्रम ठरवण्याच्या सूचना दिल्या आहेत. पहिल्यांदा शेतातील अतिक्रमण, व्यावसायिक कारणासाठी झालेले बांधकाम, उद्योगांसाठी झालेले अतिक्रमण, वीटभट्टी, जनावरांचे गोठे यानंतर निवास व्यवस्‍था, अशी यादी केली आहे. अतिक्रमण किंवा गायरान नाही, तेथील सरकारी मनुष्यबळ शेजारील गावात पाठवले जाणार आहे.
...