कर्मचारी सोसायटीसाठी फोडाफोडी सुरु | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्मचारी सोसायटीसाठी फोडाफोडी सुरु
कर्मचारी सोसायटीसाठी फोडाफोडी सुरु

कर्मचारी सोसायटीसाठी फोडाफोडी सुरु

sakal_logo
By

जिल्‍हा परिषद .... लोगो
....

कर्मचारी सोसायटीसाठी फोडाफोडी सुरू

दुरंगी लढतीची चिन्‍हे; प्रचार कार्यालये थाटली

सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. २८ : जिल्‍हा परिषद कर्मचारी सोसायटी निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापू लागले आहे. सध्या तरी सत्ताधारी व विरोधी अशा दोनच आघाड्यांमध्ये ही निवडणूक होईल, असे चित्र आहे. अर्ज भरण्याची मुदत दोन दिवसात संपणार असल्याने अर्ज भरण्यासाठी झुंबड उडत आहे. काठावरच्या कार्यकर्त्यांच्या बेडूकउड्या सुरु झाल्या आहेत. दोन्‍हीही गटांनी थाटात प्रचार कार्यालये सुरू केली आहेत. त्यामुळे कर्मचारी जिल्‍हा परिषदेत कमी आणि या प्रचार कार्यालयातच अधिक दिसत आहेत. यावेळच्या निवडणुकीत मात्र काटाजोड लढत पहायला मिळेल, असे प्राथमिक चित्र आहे.

जिल्‍हा परिषद कर्मचारी सोसायटीची निवडणूक ही या वेळी रंगतदार होत आहे. मागील निवडणुकीपासूनच सातत्याने ही संस्‍था चर्चेत आहे. प्रत्येक सर्वसाधारण सभेत आरोप, प्रत्यारोपांच्या फैरी उडाल्या. मात्र सत्ताधारी हे अनुभवी असल्याने त्यांनी त्या जोरावर सत्ता निभावून नेली. मात्र शेवटच्या टप्‍प्यात गडहिंग्‍लज येथील अपहार चव्‍हाट्यावर आला. परिणामी सत्ताधाऱ्यां‍ची या प्रकरणात पळताभुई थोडी झाली. यातून विरोधकांनी लावून धरलेली चौकशी, या चौकशी अहवालात ठेवण्यात आलेला ठपका यामुळे काहीप्रमाणात सत्ताधाऱ्‍यांची अडचण झाली आहे. यातच सत्ताधारी गटाच्या काही नेत्यांनी मागील निवडणुकीवेळी तिकीट वाटप करताना केलेले प्रताप, निवृत्त झालेली व पदोन्‍नतीने गेलेली नेतृत्‍वाची फळी याचा परिणामही होण्याची शक्यता आहे.

विरोधकांमध्येही सर्वकाही अलबेल आहे, असेही नाही. पाच वर्षे केवळ वार्षिक सभेपुरते तोंड उघडणे आणि निवडणुकीपुरते कर्मचारी आणि त्यांचे प्रश्‍‍न, अडचणींवर चर्चा करुन मते मिळवणे तेवढे सोपे नाही. तसेच गतवेळी विरोधी पॅनेलचा कारभार पाहणारे कर्मचारी आता सत्ताधाऱ्यां‍च्या कळपात घुसले आहेत. त्यामुळे विरोधकांच्या आघाडीचे नेतृत्‍व करणारी फळी अजून समोर आलेली नाही. कर्मचाऱ्यां‍चे विविध गट आहेत, तालुक्यातील मोठे मतदान आहे, त्यांना सोबत घेणे हे विरोधकांसमोर मोठे आव्‍हान असणार आहे. या सर्व चर्चेची जबाबदारी जुन्याजाणत्या अनुभवी व प्रभावी लोकांकडून अपेक्षित असली तरीही त्याची उणीव मात्र विरोधी गटात दिसत आहे. त्यामुळे या निवडणुकीचे खरे रंग हे माघारीनंतरच स्‍पष्‍ट होणार आहेत.
....

सकाळी सत्ताधारी, दुपारी विरोधक
अनेक कर्मचारी व संघटना देखील काठावर आहेत. त्यांची भूमिका अजून ठरलेली दिसत नाही. त्यामुळे सकाळी सत्ताधारी गटासोबत तर दुपारनंतर विरोधकांच्या कार्यालयात सुरु असलेल्या चर्चात हे कर्मचारी सहभागी होत आहेत. दोन्‍ही गटांची उणीदुणी काढून नेतृत्‍वाची पंचाईत करून ठेवत आहेत.