
इचल : अतिक्रमण काढणे मोहीम थांबवा
65209
इचलकरंजी : गायरान अतिक्रमणविरोधातील मोहीम थांबवावी, या मागणीसाठी दलित समाज विकास परिषदेच्या वतीने प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.
....
दलित समाज विकास परिषदेचा
इचलकरंजी प्रांत कार्यालयावर मोर्चा
गायरान अतिक्रमणविरोधातील मोहीम थांबविण्याची मागणी
इचलकरंजी, ता. २८ : हातकणंगले तालुक्यातील कुंभोज, तारदाळ, तळसंदे, निमशिरगाव, उमळवाड, जैनापूर येथे भूमिहीन शेतमजूर व अनुसूचित जाती-जमातीचे लोक गेली ५० वर्षांपासून राहत आहेत. या व्यक्तिरिक्त त्यांच्याकडे जागा- घर नाही. त्यामुळे या दलित भूमिहीन शेतमजूर यांचे गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्याची कार्यवाही थांबविण्यात यावी, यासाठी दलित समाज विकास परिषदेच्या वतीने प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा काढून मागणीचे निवेदन प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांना देण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे, राज्यामध्ये गायरान जमिनीवरील अतिक्रमणे काढण्याची मोहीम सुरू असून सरसकट सर्वांना नोटिसा बजावण्यात येत आहेत. यामुळे गायरान जमिनीवर आसरा घेणाऱ्यांसमोर जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या जागेवर राहणाऱ्या कुटुंबांनी आपल्या कष्टातून झोपड्या, कच्च्या व पक्क्या स्वरूपाची घरे बांधली आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गायरान जमिनी अपवादात्मक परिस्थितीत भूमिहीन शेतमजूर अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या व्यक्तींना देणे अनुज्ञेय होते, असे निरीक्षण नोंदविले आहे. त्यानुसार अशी अतिक्रमणे काढण्याच्या मोहिमेतून वगळावीत.
या वेळी योसेफ आवळे, रवींद्र तिवडे, सचिन साठे, गंगाधर चौगुले, आदिनाथ तिवडे, मनोहर नलवडे, सुनील कांबळे, अजय सदामते यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.