
रवी इंगवले यांनी पत्रकार परिषद
... तर पोलिसांविरोधात उच्च
न्यायालयात दाद मागू
रवी इंगवले ः क्षीरसागर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर ता. २८ : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी तलवारीने केक कापण्याचा प्रकार केला आहे. जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांच्यासमोरच हा प्रकार घडला आहे. त्यामुळे आठ दिवसांत याबाबत गुन्हा दाखल न केल्यास शहर पोलिसांविरोधात उच्च न्यायालयात दाद मागू, असा इशारा शिवसेना (ठाकरे गट) शहरप्रमुख रवी इंगवले यांनी पत्रकार परिषदेत दिला.
इंगवले म्हणाले, ‘क्षीरसागर यांनी त्यांच्या वाढदिवसाचा केक तलवारीने कापला आहे. सर्वसामान्य नागरिकांनी असा केक कापला असता, तर व्हाटस्अप मेसेज बघूनही पोलिसांनी गुन्हे दाखल केले असते. विनापरवाना खुलेपणाने शस्त्र वापरप्रकरणी आपण लक्ष्मीपुरी पोलिसात तक्रार दाखल करूनही अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. पोलिसांनी कायद्याचा मान राखून अंमलबजावणी करावी आणि गुन्हा दाखल करावा.’ क्षीरसागर हे आपल्याला वेगवेगळ्या खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा ही आरोपही इंगवले यांनी केला.
यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, ‘जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत तलवारीचा वापर झाला आहे. त्यामुळे याबाबतचा गुन्हा दाखल करण्यासाठी कोणतेही वेगळे पुरावे मागण्याची गरज नाही. तातडीने गुन्हा दाखल करावा, अन्यथा आठ दिवसानंतर पोलिस उपाधीक्षक कार्यालयासमोर निदर्शने करू.
पत्रकार परिषदेस विजय देवणे, सुनील मोदी, दीपाली शिंदे, विशाल देवकुळे आदी उपस्थित होते.