
अर्थिक फसवणूक
गाड्या घेतल्या, कर्ज कोण फेडणार?
ए. एस. ट्रेडर्सचा कारभार ः ‘तेलही गेले नि तूपही’ अशी अवस्था
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २८ ः गाडीच्या किमतीच्या ६० टक्के रक्कम गुंतवणूकदाराने भरायची, उर्वरित रक्कम, कर्जाचे हप्ते कंपनी भरणार. याशिवाय गाडीच्या ६० टक्के रकमेपोटी दर महिन्याला विशिष्ट रक्कम परतावा म्हणून मिळणार अशी अमिषे दाखवून कोट्यवधी रुपये ए. एस. ट्रेडर्सने गोळा केले. अशा पद्धतीने घेतलेल्या गाड्यांचे हप्ते कोण भरणार असा सवाल या गुंतवणूकदारांसमोर आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांची अवस्था ‘तेलही गेले नि तूपही’ अशी झाली आहे.
कोट्यवधी रुपयांना गंडा घालून पोबारा केलेल्या ए. एस. ट्रेडर्सविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्याकडून झालेले कारनामे आता उघडकीला येत आहेत. यात गुंतवणूक केलेल्यांनीच हे अनुभव सांगण्यास सुरुवात केली आहे. या कंपनीकडून दुचाकी, चारचाकी वाहने कमी पैशांत देण्याचे अमिष दाखवले होते. अगदी चार-पाच लाखांच्या गाड्यापासून ते कोट्यवधी रुपयांची गाडी देण्यात येणार होती. गुंतवणूकदारांना यावर विश्वास बसावा म्हणून आपल्याच संबंधित लोकांना अशा गाड्या दिल्याचा देखावाही उभा केला. त्यातून गुंतवणूदार आकर्षित झाले.
या योजनेत गाडीच्या किमतीच्या ६० टक्के रक्कम गुंतवणूकदाराने भरायची, उर्वरित रकमेचे कर्ज संबंधिताच्या नावांवर कंपनी देणार होती. याशिवाय जी ६० टक्के रक्कम भरली, त्यापोटी दर महिन्याला विशिष्ट रक्कम परतावा म्हणून देण्याचे अमिष दाखवले. काहींना याचा लाभ जरूर झाला; पण गुंतवणुकीच्या तुलनेत परतावा वाढल्याने कंपनीचे अर्थिक गणित बिघडले आणि कंपनीला घरघर लागली. या गाड्या वाटपाचे जाहीर कार्यक्रम शहराला लागून असलेल्या एका अलिशान फार्महाऊसवर दणक्यात झाले, त्याचे व्हिडिओही व्हायरल झाले होते. आता कंपनी बंद पडल्याने गाडीसाठी भरलेली साठ टक्के रक्कम तर गेलीच; पण याशिवाय याच गाडीवर घेतलेले कर्ज फेडायचे कसे या विवंचनेत गुंतवणूकदार आहेत. यात फसगत झाल्याचे लक्षात आल्यानंतर कंपनीविरोधात तक्रार दाखल झाली. या कंपनीचा एकूण गैरव्यवहार किमान दोन हजार कोटींचा असल्याचा अंदाज पोलिस तपासात वर्तवला आहे.
चौकट
दुबईत ‘कॉईन’चे अनावरण
या कंपनीने अलीकडेच दुबईत स्वतःच्या अभासी चलनाचे अनावरण थाटामाटात केले. त्यासाठी शेकडो गुंतवणूकदारांना दुबई सफरही घडवली. या गुंतवणूकदारांच्या प्रवास खर्चच सुमारे १८ कोटींच्या आसपास झाला; पण अनावरण झालेले हे ‘कॉईन’ आहे कोठे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
चौकट
क्रेनच्या सहाय्याने पुष्पहार
या कंपनीचा प्रमुख लोहितसिंग सुभेदार याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याच सुभेदारचे पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये क्रेनच्या सहाय्याने पुष्पहार घालून स्वागत केले होते. त्यात या कंपनीशी संबंधित कोल्हापुरातील काही बड्या हस्तींचा समावेश होता. त्यादिवशी गुंतवणूकदारांना जंगी पार्टी या हॉटेलमध्ये दिली. या प्रकाराचीही चर्चा आता होत आहे.