ए.एस.ट्रेडर्सच्या संचालकांचे फोन स्विच ऑफ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ए.एस.ट्रेडर्सच्या संचालकांचे फोन स्विच ऑफ
ए.एस.ट्रेडर्सच्या संचालकांचे फोन स्विच ऑफ

ए.एस.ट्रेडर्सच्या संचालकांचे फोन स्विच ऑफ

sakal_logo
By

ए. एस. ट्रेडर्सच्या
व्यवहारांची चौकशी सुरू

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २८ ः ए. एस. ट्रेडर्स कंपनीने जादा परताना देण्याच्या बहाण्याने शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली. त्यानंतर कंपनीचे संचालक गायब आहेत. त्यामुळे त्यांना शोधून अटक करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. पोलिसांनी संशयितांच्या बँक व्यवहारांची तपासणी करणे सुरू केले असून, या फसवणुकीची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे.
आतापर्यंत शाहूपुरी पोलिस ठाण्यात १६९ गुंतवणूकदारांनी आपली फिर्याद दिली असून, या सर्वांची मिळून सुमारे ४ कोटी ८९ लाख ७२ हजारांची फसवणूक झाली आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे यासह अन्य काही शहरांमधील गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास तीन टप्प्यांमध्ये सुरू केला आहे. संशयित संचालकांना शोधणे, कंपनीच्या आणि संचालकांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करणे, तसेच कंपनीने हे पैसे कोठे गुंतवले हे शोधून काढणे याचा तापास पोलिस करत आहेत. सध्या कंपनी आणि संचालकांच्या खात्यांमधील आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याचे काम सुरू आहे. यासाठी आवश्यक असणारा पत्रव्यवहारही बँकांसोबत झाला आहे. ए. एस. ट्रेडर्सची अनेक बँक खाती आहेत. त्यापैकी काही बँक खात्यांमध्ये अनियमितता आढळली असून संशयितांनी बँक खात्यांमधील पैसे इतरत्र वर्ग करू नयेत, यासाठीही पोलिस सतर्क आहेत. कंपनीच्या खात्यांसह संचालक आणि एजंटांच्या वैयक्तिक बँक खात्यांचीही तपासणी केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
------------------

सुशिक्षित, पण अर्थनिरक्षर...
ए. एस. ट्रेडर्सकडून फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांपैकी बहुतांशजण हे सुशिक्षित आहेत. मात्र, त्यांना आर्थिक गुंतवणुकीबद्दल फारशी माहिती नसल्याचे दिसून आले. बँका किती व कसे व्याज देतात, गुंतवणूक झालेले पैसे कोठे गुंतवले जातात? जेथे पैसे गुंतवले जातात त्यातून परतावा मिळणार का? या सर्व गोष्टींशी गुंतवणूकदार अनभिज्ञ असल्याचे दिसून येते. त्यामुळे सुशिक्षत असूनही त्यांची फसगत झाली.