ऑक्ट नाईनची बँक खाती गोठवली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऑक्ट नाईनची बँक खाती गोठवली
ऑक्ट नाईनची बँक खाती गोठवली

ऑक्ट नाईनची बँक खाती गोठवली

sakal_logo
By

ऑक्ट नाईनची बँक खाती गोठवली
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २८ ः गुंतवणूकदारांना कोट्यवधींना फसवणाऱ्या ऑक्ट नाईन इनव्हेस्टमेंट सोल्युशन कंपनीच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. यासाठी कंपनीची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. कंपनीच्या संचालकांचा शोध घेण्याचे कामही गतीने सुरू आहे. जोपर्यंत संशयित ताब्यात येत नाहीत तोपर्यंत कंपनीच्या आर्थिक व्यवहारांची व्याप्ती लक्षात येणार नाही.
एका बाजूला बँकांचे व्याज दर स्थिर असताना ऑक्ट नाईन कंपनीने दरमहा ८ टक्के बोनस देण्याचे धोरण जाहीर केले. तसेच १८ महिन्यांनी मूळ रक्कम परत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर खोटी कागदपत्रे बनवणे, सेबी आणि आरबीआयची मान्यता असल्याचे सांगणे यामुळे गुंतवणूकदार आपसूक त्यांचा जाळ्यात अडकले. आतापर्यंत त्यांनी १ कोटी ७६ लाख ८० हजार रुपये कंपनीत गुंतवून घेतल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून युद्धपातळीवर तपास सुरू आहे. कंपनीचे कार्यालय बंद झाले असून संचालकही पसार झाले आहेत. त्यांच्या शोधासाठी पथक बनवले असून त्यांचा कसून शोध घेतला जात आहे. कंपनीने पैसे कोठे गुंतवले हे तपासण्यासाठी कंपनीची खाती आज गोठवली गेली. तसेच खात्यातून झालेल्या आर्थिक व्यवहारांची माहिती घेण्याचे कामही सुरू आहे. या तपासातून काही नवीन नावे, संस्था समोर येण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे.
ऑक्ट नाईन कंपनीकडून ज्यांची फसवणूक झाली आहे, अशा तक्रारदारांनी पुढे येण्याची गरज आहे. त्यांनी तक्रार दिल्यास पोलिसांना तपासात मदत होईल. त्यामुळे अशा गुंतवणूकदारांनी तक्रार द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.