
न्यायाधिशांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्नशील : न्यायमूर्ती अजेय गडकरी
न्यायाधीशांची संख्या वाढवण्यासाठी
प्रयत्नशील : न्यायमूर्ती अजेय गडकरी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १ : जिल्ह्यातील प्रलंबित खटले कमीत कमी वेळात निकाली काढण्यासाठी जिल्हा व सत्र न्यायाधीशांची संख्या वाढवणे आवश्यक आहे. त्यासाठी पाठपुरावा करणार आहे. तसेच सहकार न्यायालयाच्या डीआरटी ट्रिब्युनल कोर्ट कामकाजासाठीही उच्च न्यायालयाकडून परवानगी मिळवू देण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती तथा कोल्हापूरचे पालक न्यायमूर्ती अजेय गडकरी यांनी दिली. जिल्हा बार असोसिएशनला त्यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांबरोबर संवाद साधला.
असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. गिरीश खडके यांनी प्रास्ताविक केले. यामध्ये त्यांनी असोसिएशनने केलेले काम, वकिलांच्या अपेक्षा आणि प्रलंबित खटल्यांबाबत माहिती दिली. या वेळी न्यायमूर्ती गडकरी यांनी कोल्हापुरात जिल्हा व सत्र न्यायाधीशांची संख्या वाढवण्याबद्दल पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली. या वेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण, सचिव ॲड. विजयकुमार ताटे-देशमुख, लोकल ऑडिटर ॲड. संकेत सावर्डेकर, जिल्हा न्यायाधीश पी. एफ. सय्यद, व्ही. पी. गायकवाड, मुख्य न्यायदंडाधिकारी एस. ए. बाफना, विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्यायाधीश पंकज पाटील, न्यायाधीश पी. आर. राणे आदी उपस्थित होते.