फायर स्टेशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फायर स्टेशन
फायर स्टेशन

फायर स्टेशन

sakal_logo
By

29133, 61316

अग्निशमनपुढे ‘सहा मिनिटां’चे आव्हान!
उपनगरांचा विस्तार, वाहतूक कोंडीमुळे अडथळे; शहराला हवी आणखी दोन फायर स्टेशन
कोल्हापूर, ता. १ : उपनगरांमध्ये लोकसंख्या वाढू लागली आहे, वाहनांची वर्दळही इतकी झाली आहे की ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. या पार्श्‍वभूमीवर एखाद्या भागात आग वा इतर आपत्ती ओढवल्यास तिथे किमान सहा मिनिटांच्या आत अग्निशमन दलाची वाहने पोहचवण्याचे उद्दिष्ट महापालिकेच्या अग्निशमन विभागाने ठेवले आहे. सध्याच्या स्थितीत ते अडचणीचे आहे. त्यासाठी कार्यरत असलेल्या सहा फायर स्टेशनव्यतिरिक्त आणखी दोन स्टेशनची गरज आहे. त्यासाठी जागाही आरक्षित आहेत, पण गरज आहे ती कार्यवाहीची. महापालिकेच्या अग्निशमन विभागाने वेळोवेळी आवश्‍यक बदल करत नवनवीन साधने घेतली आहेत. २०१३ मध्ये एका संस्थेच्या मदतीने दलाचा अहवाल तयार केला होता. त्यात अंतर्भूत केलेली विविध साधने आता विभागाच्या ताब्यात आहेत. अहवालाला नऊ वर्षे होत आली असून, शहराची लोकसंख्या वाढली आहे. मोकळी उपनगरे गजबजून गेली आहेत. शहराच्या हद्दीला अगदी खेटून वस्ती उभी राहिली आहे. पूर्वीच्या शहर विस्ताराप्रमाणे सहा फायर स्टेशन सुरू केली आहेत. फुलेवाडी, टिंबर मार्केट, कावळा नाका, कसबा बावडा ही चार स्टेशन चार दिशांवर आहेत. तसेच महापालिकेच्या इमारतीत व प्रतिभानगरमध्येही स्टेशन आहे. या स्टेशनमुळे त्या त्या भागांत अग्निशमनची वाहने, जवान तातडीने पोहचत होते. आता दक्षिण बाजूला वस्ती प्रचंड वाढली आहे. या टापूत आत्ताच्या वाहनांच्या गर्दीतून फुलेवाडीतून वा महापालिकेच्या इमारतीतून सहा मिनिटात पोहचण्याची शक्यता नाही. त्यामुळे क्रांतिसिंह नाना पाटीलनगरमध्ये एक जागा आरक्षित केली आहे, पण ती फुलेवाडी फायर स्टेशनच्या जवळ येते. मार्केट यार्डच्या आजूबाजूला व बापट कॅम्प, जाधववाडी, भोसलेवाडी, कदमवाडीच्या परिसरातही अपार्टमेंटसची संख्या वाढत आहे. त्यामुळे नाना पाटीलनगरऐवजी मार्केट यार्ड परिसरातील जागा शोधली जात आहे. साकोली कॉर्नर या परिसरात स्टेशनसाठी इमारत मिळाली आहे. हा परिसर दाट लोकवस्तीचा असल्याने मिनी फायर फायटर तिथे ठेवली जाऊ शकते, पण कर्मचाऱ्यांअभावी ते सुरू केलेले नाही.
----------------
दृष्टिक्षेपात
फुलेवाडी, टिंबर मार्केट, कावळा नाका, कसबा बावडा, महापालिका इमारत, प्रतिभानगर
सहा मिनिटांत घटनास्थळी पोहचण्याचे उद्दिष्ट
वाढत्या नागरी वस्तींसाठी नवीन स्टेशन हवे
------------
पाण्याची टाकी, कूपनलिकेचे नियोजन
अग्निशमनच्या वाहनांसाठीचे पाणी स्टेशनमध्येच भरण्याची सोय होण्यासाठी कावळा नाका फायर स्टेशनच्या नवीन होत असलेल्या इमारतीत जमिनीखालील ७५ हजार लिटरची पाणी टाकी बांधण्यात येणार आहे. याशिवाय अन्य स्टेशनमध्ये कूपनलिका खोदण्याची परवानगी घेण्यात येत आहे.
-------------
चार झोपडपट्ट्यांसाठी उपाय अत्यावश्‍यक
शहरातील झोपडपट्ट्यांपैकी सु. वि. जोशीनगर, यादवनगर, कनाननगर, विचारे माळ येथील झोपडपट्टीत आपत्ती ओढवल्यास त्या ठिकाणी पोहचणे अग्निशमन दलाच्या जवानांना पोहचणे मुश्‍कील होणार आहे. या चार ठिकाणी अग्निप्रतिबंधक उपाययोजनांची अत्यंत आवश्‍यकता आहे.
--------------
कोट
अग्निशमन दल आताही प्रयत्न करून कमीत कमी वेळेत घटनास्थळी पोहचत असते, पण वाहतुकीची कोंडी, दूरवर पसरत असलेली वस्ती यामुळे दोन ठिकाणी स्टेशन आवश्‍यक आहे. त्यासाठी जागेकरिता प्रयत्न केले जात आहेत.
- तानाजी कवाळे, मुख्य अग्निशमन अधिकारी, महापालिका