
मानवी जीवनाबाबत अंतर्मुख करणारा प्रयोग ‘द केअर टेकर''
65920
कोल्हापूर : राज्य नाट्य स्पर्धेत जाणिव चॅरिटेबल फाउंडेशनने बुधवारी सादर केलेल्या ‘केअर टेकर’ नाटकातील एक प्रसंग.
मानवी जीवनाबाबत
अंतर्मुख करणारा प्रयोग
‘द केअर टेकर’
रंगभूमीवरील असंगत नाट्यप्रकार म्हणजे मानवी जीवनाचं, त्याबाबत अंतर्मुख करणारं नाटक. काहींच्या मते निराश मनांचे प्रतिबिंब त्यात उमटते. ‘द केअर टेकर’चा असाच एक देखणा प्रयोग यंदाच्या स्पर्धेत जाणिव चॅरिटेबल फाउंडेशनच्या टीमनं सादर केला. ब्रिटिश नाटककार हॅरोल्ड पिंटर यांचे हे मुळ नाटक. पण, त्याचा मराठीत अनुवाद न करता रविदर्शन कुलकर्णी यांनी त्याचे रूपांतर केले आहे. त्यांच्याच दिग्दर्शनाखाली ‘जाणिव’च्या टीमने एक चांगला नाट्यानुभव दिला. मूळ नाटक १९६० साली रंगमंचावर आले. पण, आजच्या सामाजिक परिस्थितीतही ते लागू पडते. माणसाच्या विविध इच्छा, स्वप्नपूर्ती त्यातून येणारा भौतिकवाद, माणसाचं स्वातंत्र्य, अस्तित्व म्हणजे नेमकं काय, अशा विविध अंगांनी मंथन करत हे नाटक रंगते. अविनाश आणि राजेश हे दोन भाऊ. पण, त्यांचे स्वभाव वेगवेगळे. नवनिर्मितीत आनंद मानणारा अविनाश तर राजेश व्यवहारवादी असला तरी त्याचा दृष्टिकोन भौतिकवादी. त्यातच मोहन नावाचा एक भटका माणूस येतो. त्याचा स्वभावच मिजासखोर आणि जातीयवादी. तो स्वतःला सतत असुरक्षित समजत असतो. या तिघांच्या स्वभावानुसार त्यांची मतंही वेगवेगळी. त्यांचातील संवाद रंगत जातो आणि माणूसपणाचा शोध घेत नाटक पुढे सरकते. नाटक सहा दशकांपूर्वीचे असले तरी वर्तमान सामाजिक परिस्थितीवरही ते तितक्याच चपलखपणे भाष्य करते.
----------
पात्र परिचय
- श्रीपाद पाटील (राजेश), समीर पंडितराव (अविनाश), राजन जोशी (मोहन).
- दिग्दर्शक : रविदर्शन कुलकर्णी
- नेपथ्य : संजय हळदीकर, अक्षय सुतार
- प्रकाशयोजना : शंतनू पाटील, सुधर्म देसाई
- संगीत : विपुल देशमुख, ओंकार पाटील
- निर्मिती प्रमुख : मनीष देसाई
- निर्मिती साहाय्य : विशाल देसाई, पी. डी. कुलकर्णी
- रंगमंच व्यवस्था : श्रीजीवन तोंदले, अजिंक्य यादव, ओंकार मासरणकर, चिराग खुटकूळ, किरण पोटे, विकास गुळवणी.
------------
आजचे नाटक
- डबल गेम
- नवनाट्य मंडळ, आजरा
- संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह, सायंकाळी सात वाजता
--------------
अशीही वेगळी ‘जाणिव’
यंदाची स्पर्धा रंगात आली असतानाच संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह परिसरात पर्यावरणाचा विचार रुजवणारी आणखी एक चांगली गोष्ट घडते आहे. ‘एचआयव्ही‘सह जगणाऱ्या महिला व मुलींसाठी काम करणाऱ्या सुषमा बटकडली यांच्या जाणिव संस्थेसाठी नुकताच हक्काचे घरकुल उभारले तेथे दोन जणी निवारा मिळाला असून त्यांनी आत्मनिर्भरतेसाठी कापडी पिशव्यांचा व्यवसाय सुरू केला आहे. प्लास्टिकपासून मुक्ती हा पर्यावरणीय विचार त्यामागे आहे. या ठिकाणी तयार झालेल्या कापडी पिशव्या नाट्यगृहावर विक्रीसाठी उपलब्ध असून रसिकांकडून त्यालाही मोठा प्रतिसाद मिळतो आहे. दरम्यान, स्पर्धेत बुधवारी सादर झालेले नाटक जाणिव चॅरिटेबल फाउंडेशनच्या बॅनरखाली सादर झाले. ही संस्था वेगळी असून ती व्यसनमुक्तीसाठी काम करणारी संस्था आहे.