आजरा ः नगरपंचायत मासिक सभा बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा ः नगरपंचायत मासिक सभा बातमी
आजरा ः नगरपंचायत मासिक सभा बातमी

आजरा ः नगरपंचायत मासिक सभा बातमी

sakal_logo
By

कर्पेवाडीचा समावेश आजरा हद्दीत करा
मासिक सभेत मागणीचा ठराव ; वळण रस्त्याबाबतही ठराव मंजूर, पायाभूत सुविधाबाबत चर्चा
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. १ ः कर्पेवाडीतील रहिवासी नगरपंचायतीला मतदान करीत असले तरी त्यांच्या गावाचा नगरपंचायतीच्या शहरविकास आराखड्यात समावेश नाही. त्यामुळे कर्पेवाडी हद्दीचा आजरा नगरपंचायतीमध्ये समावेश करावा, अशी मागणी आज झालेल्या नगरपंचायतीच्या सभेत नगरसेवक आनंदराव कुंभार यांनी केली. याबाबतचा ठरावही घेतला. शहराबाहेरून अवजड वाहनांसाठी वळण रस्ता (बायपास) व्हावा, अशी मागणीही झाली. याबाबतचाही ठराव मंजूर केला. विविध पायाभूत सुविधांबाबत चर्चा झाली. मासिक सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी होत्या.
आजऱ्याच्या प्रारूप विकास आराखड्यावर चर्चा सुरु असताना नगरसेवक श्री. कुंभार म्हणाले, ‘कर्पेवाडीचा समावेश आराखड्यात नाही. कर्पेवाडीचे २३६ गट नंबरचे क्षेत्र वगळले आहे. याबाबत अनेकदा महसूल प्रशासनाने आदेश दिले. पण अंमलबजावणी झालेली नाही. येथील रहिवासी मतदान करीत आहेत. त्यांचा नगरपंचायतीमध्ये समावेश करावा, अशी सूचना मांडली. ज्येष्ठ नगरसेवक चराटी यांनी अनुमती देत ठराव मांडला. ठराव पारित करण्यात आला. श्री. चराटी म्हणाले, ‘अवजड वाहनांसाठी शहराबाहेरून वळण रस्ता करावा अशी मागणी नागरिक करीत आहेत. याबाबत चर्चा होवून ठराव मंजूर केला. आठवडी बाजाराचा लिलाव ४ लाख ४० हजारांना दिल्याचे सांगण्यात आले. अधिकारी व कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान द्यावे व स्वच्छता अभियानासाठी शहर समन्वयक नेमण्याबाबतही चर्चा झाली. शहरात हायमॅक्स दिवे लावण्यात येणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगताच आधी बंद हायमॅक्स दिवे सुरू करा; मग दिवे लावा, अशी सूचना नगरसेवक संभाजी पाटील यांनी केली. लवकरच अग्निशमनचे वाहन मिळणार असून नगरपंचायतीकडील वाहनांसाठी शेड उभा करण्याची सूचना चराटी यांनी दिली. महत्त्वाकांक्षी पाणी योजना अंतिम टप्प्यात असून निविदा लवकर निघेल; अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी उपनगराध्यक्षा अस्मिता जाधव, नगरसेवक किरण कांबळे यांनी सूचना मांडल्या. नगरसेवक सिकंदर दरवाजकर, शुभदा जोशी, शकुंतला सलामवाडे, अनिरुध्द केसरकर, रेश्मा सोनेखान, यासीराबी लमतुरे, सुमय्या खेडेकर, यास्मीन बुड्डेखान यांनी चर्चेत सहभाग घेतला. प्रशासकीय अधिकारी राकेश चाैगुले यांनी प्रशासनाची बाजू सांभाळली. वरिष्ठ कारकून संजय यादव यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले.

चाैकट-
प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी गाडे यांची भेट
प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी सुहास गाडे यांनी सभेला उपस्थित राहून माहिती घेतली. या वेळी त्यांनी मार्गदर्शन केले. तहसीलदार विकास अहिर उपस्थित होते.