
फायरला कर्मचारी नेमा
65955
अग्निशमन विभागाला
१२६ कर्मचाऱ्यांची गरज
जागा भरण्यासाठी ‘कॉमन मॅन’चे निवेदन
कोल्हापूर, ता. १ ः महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या सहा फायर स्टेशनसाठी १२६ कर्मचाऱ्यांची जरूरी आहे; पण पूर्वी मंजूर १०८ पदांपैकी ८३ पदे रिक्त आहेत. ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या जिवावर काम सुरू आहे. त्यांनाही योग्य सुविधा दिल्या जात नाहीत. त्यामुळे विभागाच्या गरजेप्रमाणे तातडीने कर्मचारी नेमावेत, अशी मागणी कॉमन मॅन व प्रजासत्ताक सामाजिक संस्थेने निवेदनाद्वारे केली. त्यानुसार प्रशासनाने कर्मचारी नेमण्याचे आश्वासन दिले.
उपायुक्त रविकांत आडसूळ यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, एका शिफ्टसाठी एका फायर फायटरवर ७ कर्मचारी पाहिजेत. ड्रायव्हर, तांडेल, स्टेशन ऑफिसर असे प्रत्येकी एक व ४ फायरमन पाहिजेत. त्यानुसार एका शिफ्टमध्ये ६ गाड्यांवर ४२ कर्मचारी पाहिजेत. म्हणजेच एका दिवसासाठी ६ फायर स्टेशनवर १२६ कर्मचाऱ्यांची गरज आहे. १०८ मंजूर फायरमनच्या पदापैकी ८३ रिक्त आहेत. मंजूर २१ तांडेल पदापैकी १० पदे रिक्त आहेत. ३२ ड्रायव्हर पदांपैकी २८ रिक्त आहेत. तीन स्थानक अधिकारी पदापैकी २ रिक्त आहेत. मुख्य अग्निशमन अधिकाऱ्याचा प्रभारी कार्यभार आहे. रिक्त पदांच्या बदल्यात दहा हजाराच्या ठोक मानधनावर १२ वर्षांपासून ५० फायरमन कार्यरत आहेत. जीव धोक्यात घालून ते सेवा देतात. पण ते प्राथमिक सुविधांपासून वंचित आहेत. गणवेश, गमबूट दिले जात नाहीत. कायम कर्मचाऱ्यांना कुटुंबीयांसह सावित्रीबाई फुले येथे मोफत सेवा मिळते. त्यापासूनही ठोक मानधनवाले वंचित आहेत. यासाठी तातडीने आवश्यक कर्मचारी नेमावेत. टर्न टेबल लॅडरसाठी आवश्यक आधुनिक पाण्याचा टॅंकर न घेतल्याने १३ कोटींची गुंतवणूक बिनकामाची आहे.
याबाबत उपायुक्त आडसूळ यांनी आवश्यक कर्मचाऱ्यांची तातडीने भरती होईल. टिंबर मार्केटमधील स्टेशनमधून टर्न टेबल लॅडर बाहेर काढताना येणाऱ्या अडचणींची पाहणी करून मार्ग काढू. ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना सुविधा देऊ, असे आश्वासन दिले. यावेळी ॲड. बाबा इंदुलकर, दिलीप देसाई, मुख्य अग्निशमन अधिकारी तानाजी कवाळे, मनीष रणभिसे उपस्थित होते.