कचराप्रश्‍नी पाच गावांना नोटीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कचराप्रश्‍नी पाच गावांना नोटीस
कचराप्रश्‍नी पाच गावांना नोटीस

कचराप्रश्‍नी पाच गावांना नोटीस

sakal_logo
By

पाच ग्रामपंचायतींसह मनपाला
‘कारणे दाखवा’ नोटीस

प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई; विनाप्रक्रिया कचरा टाकणे भोवले

कोल्हापूर, ता. १ ः शहराचे प्रवेशमार्ग असलेल्या अनेक रस्त्यांवर विनाप्रक्रिया कचरा टाकल्याबद्दल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बालिंगा, नागदेववाडी, शिंगणापूर, पाचगाव, मोरेवाडी या पाच ग्रामपंचायतींबरोबर महापालिकेलाही कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याबाबत कॉमन मॅन व प्रजासत्तास सामाजिक संस्थेने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांसमवेत संयुक्त पाहणी केली होती. त्यानंतर नोटीस काढली आहे.
मंडळाचे प्रादेशिक अधिकारी जगन्नाथ साळुंखे यांनी ग्रामीण भागातून शहराच्या हद्दीत विनाप्रक्रिया सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावरूनही तीन ग्रामपंचायतींना नोटीस दिल्या आहेत. त्यानंतर कचऱ्याबाबत ग्रामपंचायतींना नोटीस काढली. ग्रामीण भागातील कचरा, सांडपाण्यामुळे शहरातील सुविधांवर ताण पडत असल्याचे यातून तक्रारदारांनी दाखवून दिले आहे. शहरात प्रवेश करत असताना कचऱ्याचे वाढत चाललेले ढीगच स्वागताला आहेत. बांधकामाचा कचरा, प्लास्टिक, जुन्या घरगुती वस्तू, चिकनचा शिल्लक कचरा, हॉटेलचे शिळे अन्न अशा कचऱ्यामुळे प्रत्येक ठिकाणी दुर्गंधी सुटलेली आहे. याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केल्या होत्या. तक्रारींनुसार विविध प्रवेशमार्गावर संयुक्त पाहणी केली. त्यावेळीही महापालिकेला त्यांच्या हद्दीतील कचरा उचलण्याचे आदेश मंडळाने दिले होते. तर ग्रामपंचायतींच्या हद्दीतील कचऱ्याबाबत कारणे दाखवा नोटीस दिली आहे.
ग्रामपंचायतीच्या हद्दीतील रस्त्यांवर दुतर्फा अशास्त्रीय पद्धतीने व विनाप्रक्रिया कचरा टाकल्याबद्दल संबंधित ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आर. के. नगर ते शांतीनगर रोड, पाचगाव ते आर. के. नगर रोड, गगनबावडा रस्त्यावर कचरा टाकल्याबद्दल नोटीस आहे. तर महापालिकेला याच परिसरातील शहर हद्दीतील कचऱ्याबद्दल नोटीस दिली आहे. याबाबत सात दिवसांत खुलासा करण्यास सांगितला आहे. या कालावधीत खुलासा न दिल्यास काही म्हणणे नसल्याचे समजून पर्यावरण कायद्यांद्वारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे नमूद केले आहे.