
मतदार वगळले
जिल्ह्यातील ३१ हजार मतदार वगळले
ग्रामपंचायत निवडणुकीत बोगस मतदानाला बसणार आळा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ : जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. यातच जे मयत आहेत किंवा दुबार नोंदणी आहेत, असे जिल्ह्यातील ३१ हजार ३७९ मतदार यादीतून वगळले आहेत. त्यामुळे एखादा व्यक्ती मयत असताना किंवा दुसऱ्या ठिकाणी राहत असतानाही बोगस होणाऱ्या मतदानाला आळा बसण्यास मदत होणार आहे.
जिल्ह्यात ३१ लाख ५१ हजार ६५४ मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदार १६ लाख १४ हजार २८१, महिला मतदार १५ लाख ३७ हजार २५६ आणि ११७ तृतीयपंथीय मतदार आहेत. यामधील ३१ हजार ३७९ मतदारांची नावे कमी करण्यात आली आहेत. त्यामुळे १८ डिसेंबरला होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये मयत किंवा दुबार मतदारांचा समावेश दिसणार नाही. तसेच, यांच्या नावाने इतरांना बोगस मतदान करता येणार नाही. मतदार यादीतून वगळण्यात आलेल्या मतदारांपैकी सर्वाधिक मतदार हे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील आहे. या ठिकाणी ६ हजार ५९२ मतदार वगळले आहेत. तर, त्यानंतर इचलकरंजी येथील ५ हजार ३९३ मतदार वगळले आहेत.
जिल्ह्यात मयत झालेल्या मतदार वगळण्यासाठी संबंधित कुटुंबीयांकडून कोणताही प्रयत्न होत नाही. यासाठी शासकीय यंत्रणा गतिमान करावी लागत आहे. याशिवाय, एखादा व्यक्ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी रहायला गेली तर पूर्वीच्या ठिकाणी असणारे मतदान कमी करावे लागते. पण असे केले जात नाही. त्यामुळे जी व्यक्ती पूर्वीच्या ठिकाणी जात नाही, मतदार यादीत त्याचे नाव असते. अशा ठिकाणी बोगस मतदानाला खतपाणी घातले जात आहे. हे सर्व प्रकार थांबवण्यासाठी निवडणूक विभागाने जिल्ह्यातील ३१ हजार ३७९ मतदार यादीतून वगळले आहेत. यामुळे आगामी ग्रामपंचायती निवडणुकीमधील बोगस मतदानाच्या प्रयत्नाला आळा बसण्यास मदत होणार आहे.
...
मतदारसंघनिहाय यादीतून वगळण्यात आलेले मतदार
मतदार संघाचे नाव* वगळण्यात आलेले एकूण मतदार
चंदगड*१५५०
राधानगरी*१०५८
कागल*१४६५
कोल्हापूर दक्षिण*६५९२
करवीर*१८०९
कोल्हापूर उत्तर*४५५०
शाहूवाडी*१८६७
हातकणंगले*२८५५
इचलकरंजी*५३९३
शिरोळ*४२४०
एकूण* ३१ हजार ३७९