
दिल्ली सायबर क्राईम से बात कर रहा...
मैं दिल्ली सायबर क्राईम से बात कर रहा हॅूं
घाबरून जाऊ नका - असा कॉल तुम्हालाही येऊ शकतो
लुमाकांत नलवडे : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ : `मैं दिल्ली सायबर क्राईम से बात कर रहा हॅूं.’ आपका लडकी के साथ का व्हिडिओ सोशल मीडियापर व्हायरल हो रहा है, तुम्हे मिटाने का है, क्या जेल जाना है....’ एका प्रतिष्ठित व्यक्तीला हा कॉल आला आणि त्यांच्या पायाखालीच वाळूच घसरली, त्यांना धक्काच बसला. तुम्हालाही असा कॉल येऊ शकतो. घाबरून जाऊ नका, याची तक्रार थेट स्थानिक सायबर सेलला करा. शक्यतो असे कॉल बनावट आणि फसवणुकीच्या उद्देशाने केलेले असतात.
फसवणुकीचा हा आणखी एक नवा फंडा आता कोल्हापूरसह परिसरातील जिल्ह्यात पाहण्यास मिळत आहे. सायबर क्राईम ब्रँच हा पोलिसांचा एक विभाग आहे. त्यामुळे त्याचा गैरफायदा हे फसवे हँकर्स उचलतात. दिल्ली सायबर क्राईम ब्रॅचमधून बोलतोय, असे हिंदीत सांगितले जाते. तुमचा एका मुलीबरोबर अश्लील व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामुळे तुम्हाला आणि त्या मुलीलाही अटक केली जाणार असल्याचे सांगण्यात येते. मिटवायचे आहे का नाही? अशा आशयाचे संभाषण त्या कॉलवरून होते. काही वेळा हे कॉल रेकॉर्डिंगसुद्धा होत नाहीत. मात्र ज्याला हा कॉल येतो तो व्यक्ती क्षणभर सैरभैर होतो. आपण कोठे चुकलो आहे, यासाठी पाच-दहा वर्षे मन मागे फिरून येते. मात्र थोड्यावेळाने लक्षात येते आपण असे काहीच केलेले नाही. भीतीचे काहीच कारण नाही. मन घट्ट केले जाते. पण तरीही आपल्या फोटोचे मिक्सिंग करून कोणी अश्लील पोस्ट व्हायरल केली तर? असा पटकन विचार मनात सातत्याने येत राहतो.
कोल्हापुरातील एका उच्चशिक्षित व्यक्तीला हा कॉल आला. पहिल्या दिवशी त्यांना कॉल आला तेंव्हा तेही क्षणभर सैरभैर झाले, नंतर सावरले. दुसऱ्या दिवशीही पुन्हा कॉल आले तेव्हा त्यांनी सायबर सेलला तुमच्या विरोधात तक्रार दिल्याचे सांगून समोरील व्यक्तीची बोबडी वळली. मात्र असाच कॉल अन्य कोणालाही येऊ शकतो. त्यामुळे असे कॉल आल्यास घाबरून जाऊ नका.
---------
काय करावे?
- संवाद सुरू असतानाच फसव्या कॉलचा अंदाज घ्या
- वैयक्तिक माहिती, बॅंक डिटेल्स देऊ नका
- कोणताही व्यवहार करू नका, शक्य झाल्यास कॉल रेकॉर्ड करा.
- स्थानिक सायबर सेलला किमान ऑनलाईन माहिती द्या
- घाबरून जाऊन कोणतेही पाऊल उचलू नका.
- डोके शांत ठेवा, विचार करा, पोलिसांची मदत घ्या.
-----------
कोट नंतर देतो.