केएमटी फेऱ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केएमटी फेऱ्या
केएमटी फेऱ्या

केएमटी फेऱ्या

sakal_logo
By

केएमटीच्या १९ फेऱ्या बंदचा प्रस्ताव
१० महिन्यात १४ कोटी तोटा; संघटनांनी प्रशासनाला धरले धारेवर

कोल्हापूर, ता. २ ः केएमटीने शहरी, ग्रामीणमधील तोट्यातील प्रत्येक मार्गावरील फेऱ्यांचे सर्वेक्षण केले. त्यातून कंदलगाव, पेठवडगाव, कळंबा, कागल, कुडित्रे या पाच मार्गावरील तब्बल १९ फेऱ्या प्रचंड तोट्यात असल्याने त्या बंद करण्याचा प्रस्ताव प्रशासक व अतिरिक्त आयुक्तांकडे पाठवल्याची माहिती केएमटीच्या अतिरिक्त परिवहन आयुक्त टिना गवळी यांनी आज दिली.
पाच फेऱ्यांमधून तीन आकडी उत्पन्न मिळालेले नाही, तर पंधरा फेऱ्यांमध्ये प्रवाशांची संख्या २५ च्या आतच आहे. दहा महिन्यात १४ कोटींच्या तोट्याबरोबरच ही बाब आज सामाजिक संघटनांसोबतच्या बैठकीत समोर आल्यावर कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तोट्यातील फेऱ्यांबाबत कारवाई होईपर्यंत आता थांबणार नाही, असा इशाराही दिला.
कॉमन मॅन संघटना, प्रजासत्ताक सामाजिक संघटना, जिजाऊ ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांबरोबर गवळी व अधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी केएमटीने केलेल्या सर्वेक्षणाची माहिती दिली, तर आतापर्यंत किती तोटा झाला आहे याची माहिती दिली. ही माहिती घेतल्यानंतर ॲड. बाबा इंदूलकर यांनी या बाबी प्रशासकांकडे, अतिरिक्त आयुक्तांकडे लेखी स्वरूपात सादर केल्या आहेत का? मार्ग तोट्यात आहेत तर बंद का केले नाहीत? उपसमितीसमोर का मांडले नाही? काटकसरीने कारभार करायचा असताना १० महिन्यात १४ कोटी तोटा होत असताना शहराबाहेरील जबाबदारी नसताना ग्रामीण भागात बस का पाठवत आहात? असे प्रश्‍न उपस्थित केले. तोट्यामुळे महापालिकेने केएमटीला ११ कोटीचे सहाय्य केल्याचेही सांगितले. दिलीप देसाई यांनी तुम्ही जर वरिष्ठांना अहवाल दिला नाही तर त्याची जबाबदारी तुमच्यावर येणार आहे. त्यासाठी अहवाल का देत नाही असे विचारले. तसेच यापुढे केएमटीला नोटीस पाठवली जाईल असेही सांगितले. त्यावर गवळी यांनी प्रशासक, अतिरिक्त आयुक्तांशी चर्चा केलेली आहे. सर्वेक्षणातील निष्कर्षानुसार कारवाई करण्याचे अधिकार वरिष्ठांचे आहेत. त्यानुसार अहवाल दिला जाणार आहे असे सांगितले.

ठळक चौकट
तोट्यातील फेऱ्या
कंदलगाव-छत्रपती शिवाजी चौक ते एसटी स्टॅंड व परत (सायं.७ वा.)
कंदलगाव-छत्रपती शिवाजी चौक ते एसटी स्टॅंड व परत (दुपारी १.२५ वा.)
कंदलगाव-छत्रपती शिवाजी चौक ते एसटी स्टॅंड व परत (स. ७.३० वा.)
पेठवडगाव-म. प्रताप चौक ते मुडशिंगी तिथून शाहू मैदान
पेठवडगाव-छत्रपती शिवाजी चौक ते कळंबा व परत
कळंबा- छत्रपती शिवाजी चौक ते कळंबा व परत
कागल-शाहू मैदान ते आर. के. नगर व परत
कुडित्रे- गंगावेश ते कुडित्रे व परत (सायं. ५ वा.)
कुडित्रे- गंगावेश ते कुडित्रे व परत (स. ६.३५ वा.)

ठळक चौकट
दहा महिन्यातील तोटा
सर्वाधिक ऑक्टोबर-२ कोटी ४० लाख
चार महिन्यात १ कोटींवर
चार महिन्यात २ कोटींवर
.....