
रस्ते ठेकेदारांवर कारवाई
कामाच्या दिरंगाईबद्दल
ठेकेदारांना दणका
महापालिकेची ३९ जणांना नोटीस
कोल्हापूर, ता. २ : शहरातील रस्ते, गटर, कॉंक्रिटीकरण अशा विविध कामांबाबत होत असलेल्या दिरंगाईबाबत आज महापालिकेने ठेकेदारांना दणका दिला. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी कडक धोरण अवलंबत कार्यादेश देऊन नऊ महिने झाले तरी काम सुरू न करणाऱ्या शैलेश भोसले या ठेकेदाराला २४ हजारांचा दंड केला. तसेच ३९ ठेकेदारांना नोटीस बजावल्या. यामध्ये एका मध्यवस्तीतील माजी महापौरांचा निकटचा नातेवाईक तसेच महापालिकेचे बहुतांश रस्त्यांची कामे घेणाऱ्या चार मोठ्या ठेकेदारांचाही समावेश आहे.
पावसाळ्यानंतर रस्ते कामांवरून महापालिकेला लक्ष्य केले जात आहे. विविध संघटनांनी आंदोलने केली असून, त्याची दखल घेत प्रशासकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना काही प्रातिनिधीक रस्त्यांची पाहणी करायला सांगितले होते. त्यावेळी एका ठेकेदाराला २० रस्त्यांची कामे दिली असल्याचे दिसले. त्यातून कामांना वेळ होत असल्याचेही समोर आले. हा धागा पकडत प्रशासकांनी विविध कामांचाही आढावा घेतला. त्यातून अनेक ठेकेदारांनी कामे सुरू केली नसल्याच्या तक्रारीही आल्या.
छत्रपती शिवाजी मार्केट विभागीय कार्यालयांतर्गत महालक्ष्मी मंदिर प्रभागातील जामदार वाडा, मोमीन ग्लास सेंटर, सोडा कॉर्नर, ताईबाई गल्ली, शायरन फुटबॉल ग्रुप, डॉ. पाटील बोळ घर ते शिंदे घर या परिसरात गटर व पॅसेज काँक्रिटीकरण करण्याचे काम ठेकेदार भोसले यांच्या नावे मंजूर आहे. त्या कामाचा कार्यादेश १५ फेब्रुवारीला दिला आहे. कामास १८० दिवस मुदत दिली आहे. ठेकेदार भोसले यांनी मुदतीत काम सुरू केलेले नाही. त्यामुळे प्रशासक डॉ. बलकवडे यांनी २४ हजाराचा दंड ठोठावण्याच्या सूचना उपशहर अभियंत्यांना दिल्या. त्याप्रमाणे विभागीय कार्यालयाने भोसले यांना त्यांच्या आदा करायच्या बिलातून दंडाची रक्कम कपात केली.
याबरोबर महापालिकेकडील ११९ कामे वेळेत सुरू केली नसल्याबद्दल ३९ ठेकेदारांना नोटीस बजावल्या आहेत. त्यामध्ये शहरातील बहुतांश रस्त्यांची कामे घेणारे प्रमुख ठेकेदारांचा समावेश आहे. त्यातील काही ठेकेदारांना तर आपल्यावर ‘वरदहस्त’ असल्याने कुणी काही करू शकणार नाही असे वाटत होते. काही तर ठेका मिळवण्यासाठी महापालिकेत नानाविध प्रयत्न करतात. त्या साऱ्यांना प्रशासकांनी नोटीस काढून इशाराच दिला असल्याची चर्चा महापालिकेत आहे.