
भारत पाटणकर सत्कार
66199 फोटो
....
विद्रोही साहित्य संमेलनातून घडते नवनिर्मिती
डॉ. भारत पाटणकर ः विद्रोही संस्कृतिक चळवळीतर्फे सत्कार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ : ‘विद्रोही साहित्य व संमेलन हे सकारात्मक ऊर्जा देते. त्यातून नव्या जगण्याची उमेद वाढते व नवनिर्मिती घडत जाते,’ असे प्रतिपादन श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी आज येथे केले.
डॉ. पाटणकर यांची १४ व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विद्रोही संस्कृतिक चळवळीतर्फे आयोजित सत्कार व मुलाखत कार्यक्रमात ते बोलत होते. दलितमित्र व्यंक्काप्पा भोसले यांच्या हस्ते डॉ. पाटणकर यांचा सत्कार झाला. या वेळी डॉ. प्रसन्न नागावकर व अनिल साठे यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली.
डॉ. पाटणकर म्हणाले, ‘‘विद्रोही साहित्य संमेलनाच्या अगोदर अनेक गोष्टी घडल्या आहेत. दलित, आदिवासी, ग्रामीण साहित्य संमेलन तेव्हा होत होती. मात्र कष्टकऱ्यांचे जगण्याचे विषय संमेलनात यावेत यातून विद्रोही साहित्य संमेलनाचा विचार पुढे आला. शिवसेना- भाजप सरकारच्या राज्यात अखिल भारतीय संमेलनावरही सरकारचा दबाव होता. तो सगळ्यांनाच मान्य होता असे नाही. तरीही अस्वस्थता होती. तेव्हा मी मुंबईत चळवळीत होतो. मुंबईच्या संस्कृतिक जीवनात कामगार मोठ्या संख्येने चळवळीला जोडले होते. कष्टकऱ्यांच्या चळवळीतील नेत्यांत काही वैचारिक मतभेद जरूर होते. तरीही विद्रोही संमेलन घेण्यासाठी मात्र सर्वजण एकत्र आले. विद्रोही साहित्य संमेलनासाठी मुंबईतील नायगाव किंवा शिवाजी पार्क घेणार होतो. तेथे सर्व कामगारांच्या अनेक सभा झाल्या होत्या. तरीही आम्ही धारावी परिसर निवडून तेथे विद्रोही संमेलन घेतले. सगळे राबल्याने संमेलन यशस्वी झाले, तो प्रवास आज १४ व्या विद्रोही साहित्य संमेलनापर्यंत आला, त्याचे अध्यक्षपद लाभले ही बाब तमाम कष्टकऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारी आहे.’’
....
महात्मा फुलेंचे ‘ते’ पत्र
महात्मा फुलेंनी लिहिलेले पत्र विद्रोही साहित्य संमेलनाची दिशा दाखवते. त्या पत्रातील आशय असा होता की, तुमच्या (उच्च वर्गाच्या) पुस्तकांमध्ये कष्टकऱ्यांचे जीवन सांगणारे काही नाही. त्यामुळे आमचे काही तुमच्या साहित्यात येत नसेल तर आम्ही तुमच्या साहित्य संमेलनात कशासाठी येऊ? जेव्हा कधी तुम्ही आमचे जगणे लिहाल, तेव्हा आम्ही तुमच्या संमेलनास येऊ. हेच पत्र विद्रोही संमेलन स्थळावर मोठ्या अक्षरात लिहून ठेवले होते. तीच संमेलनाची लक्षवेधी घटना होती, अशी मुंबईतील संमेलनाची आठवण डॉ. पाटणकर यांनी सांगितली.