अमिषाचे बळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अमिषाचे बळी
अमिषाचे बळी

अमिषाचे बळी

sakal_logo
By

अज्ञान, मोह, घाई संकटात नेई

आमिषाचे बळी ः सुशिक्षित, नोकरदारांचाही समावेश

सकाळ वृत्तसेवा,
कोल्हापूर, ता. ३ ः कमी वेळेत जादा परतव्याचा मोह, गुंतवणूक करायचीय, पण कोठे? या विषयीचे असलेले अज्ञान आणि त्यातून गुंतवणुकीसाठी केलेली घाईच अनेकांना संकटात नेणारी ठरली आहे. विविध कंपन्यांच्या आमिषाला बळी पडलेल्यांत अशिक्षितच नव्हे तर सुशिक्षित, नोकरदार, शिक्षक यांचाही समावेश आहे. वरवर ही फसवणूक कमी वाटत असली तरी किमान दोन ते अडीच हजार कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे.
कमी वेळेत जादा व्याजाचे आमिष दाखवून अनेक कंपन्यांचे पेव जिल्ह्यात फुटले आहे. या जोडीला अभासी चलनाचाही भूलभुल्‍लैया बाजारात आला. कोरोनामुळे दोन वर्षे अर्थकारण ठप्प असताना अशा कंपन्या आणि चलनात मात्र अनेकांनी आपल्या आयुष्याची पुंजी घातली आहे. सुरूवातीला ठरल्याप्रमाणे परतावा आला, पण शेवटच्या टप्प्यात गुंतवणूक केलेल्यांचे पैसे येणे बंद झाल्यानंतर या कंपन्यांचा खरा चेहरा आता समोर आला आहे.
ए. एस. ट्रेडर्स, ऑक्टा ९ या कंपन्यांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर या फसवणुकीचा खरा चेहरा बाहेर आला. कोल्हापूर आणि परिसरात अशा शेकडो कंपन्यांची कार्यालये कार्यरत आहेत. त्यात नोकरीच्या शोधात असलेले अनेक बेरोजगार तरुण काम करतात. या तरुणांकरवीच ग्रामीण भागात हा फसवणुकीचा फंडा अधिक जोमात सुरू होता. वर्षात दामदुप्पट, ठराविक रकमेपेक्षा जादा गुंतवणूक केली तर दुबई सहल, चार किंवा दुचाकी गाडीची भेट अशा आमिषालाच अनेकजण बळी पडले आहेत.
या फसवणुकीबरोबरच सायबर फसवणुकीतूनही अनेकांना लुटले आहे. त्यात क्रिप्टो करंन्सी, व्‍हिडिओ केवायसी, सेलिब्रिटींचा वाढदिवस सांगून फसवणूक, फेक कस्टमर केअर, स्क्रिन शेअर, लोन ॲप, सेक्स्‍टॉर्शन, वर्क फ्रॉम होम अँड वर्क ऑर्डर अशा प्रकारांचा समावेश आहे.
............

नात्यातील लोकच गोत्यात
जादा परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक झालेल्या प्रकरणात नात्यातीलच लोक गोत्यात आले आहेत. अशा कंपनीत काम करणाऱ्या किंवा अभासी चलनाची एजन्सी घेतलेल्या तरुणांनी सुरूवातील आपल्या कुटुंबातील, नात्यातील किंवा मैत्रीतील लोकांना यात गुंतवले. पण परतावा मिळायचा बंद झाल्यानंतर या नात्यातच आता कडवटपणा आला आहे. त्यातून नातेवाईकांत भांडणे झाल्याच्याही अनेक घटना घडल्या आहेत.
...........
फसवणूक अशी टाळा

१. अनोळखी फोनला उत्तर देऊ नका. त्यांना आपल्या व्यवहाराची माहिती शेअर करू नका.
२. कंपनीत गुंतवणूक करण्यापूर्वी अशा कंपन्यांची माहिती घ्या.
३. मोबाईलला येणारे मोफत ॲप डाउनलोड करू नका. त्यातून आपला डेटा संबंधितांपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.
४. जादा पैशाचा मोह टाळा, घाईने कोणत्याही गुंतवणुकीकडे आकर्षित होऊ नका
५. पैसे गुंतवायचेच असतील तर व्याज कमी मिळू दे, पण त्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांसह इतर पर्यायांचा अभ्यास करा
.................

‘सध्या जो फसवणुकीचा प्रकार कंपन्यांकडून सुरू आहे, त्या कंपन्यांकडून अवास्तव परतावा मिळू शकत नाही. आतापर्यंत वर्षाला १२ ते १३ टक्के व्याज शक्य झाले आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार पाच ते सहा टक्के परतावा मिळतो. पण जादा परतावा मिळत नाही हे माहिती असूनही लोक अशा कंपन्यांत गुंतवणूक करतात आणि अडचणीत येतात.

समीर कुलकर्णी, कार्यकारी संचालक, ट्रेडनेट कंपनी