
लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून चौघे इच्छुक
लोकसभेसाठी ‘राष्ट्रवादी’कडून चौघे इच्छुक
---
आमदार मुश्रीफ; चेतन नरके, व्ही. बी. पाटील यांच्या नावांचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे सध्या चार उमेदवार इच्छुक आहेत. यात ‘गोकुळ’चे संचालक चेतन नरके यांच्यासह उद्योगपती व्ही. बी. पाटील यांच्या नावाचा समावेश आहे. तसेच, अन्य दोन उमेदवारही असल्याचे सांगत ‘राष्ट्रवादी’कडे उमेदवारांची कमी नाही, असे सूचक वक्तव्य आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.
जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीची तयारी केली आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी चाचपणी, प्रचारयंत्रणा यावर भाजपने लक्ष केंद्रीत केले आहे. कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूर व इचलकरंजी लोकसभा मतदारसंघात भाजपचे ‘कमळ’ फुलवण्याची घोषणा करण्यात आली. यातच ‘गोकुळ’चे संचालक चेतन नरके यांच्या उमेदवारीची घोषणा झाली. या सर्व पार्श्वभूमीवर आमदार मुश्रीफ यांनी भूमिका मांडली.
‘गोकुळ’चे माजी चेअरमन अरुण नरके यांनी त्यांचे पुत्र व ‘गोकुळ’चे संचालक चेतन नरके हे ‘राष्ट्रवादी’कडून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले. याबाबत विचारले असता आमदार मुश्रीफ म्हणाले, की नरके यांनी ‘राष्ट्रवादी’चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच आपल्याबरोबर चर्चा केली आहे. अरुण नरके हे ‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेणार आहेत. चेतन नरके हे ‘राष्ट्रवादी’कडून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्याचप्रमाणे उद्योगपती व्ही. बी. पाटील हेही लोकसभा लढविण्यासाठी इच्छुक असल्याचे आमदार मुश्रीफ यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीसाठी अजून दीड वर्ष बाकी आहे. उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. अनेक नेते उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे पक्षाकडे उमेदवारांची कमतरता नाही. योग्यवेळी याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
...
‘ए. वाय.’ आज तरी आमच्याबरोबर
काडसिद्धेश्वर महाराजांच्या निमंत्रणावरून ‘राष्ट्रवादी’चे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील हे कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख पाहुणे होते. मात्र, ए. वाय. हे वेगळा विचार करणार नाहीत. आजतरी ते ‘राष्ट्रवादी’बरोबर असल्याचे सांगत आमदार मुश्रीफ यांनी या विषयावर पडदा टाकला.