
फटबॉल
अर्जेंटिनाची उपांत्य फेरीत धडक
मेस्सीचा करिष्मा; ऑस्ट्रेलियाची अखेरच्या क्षणापर्यंत चिवट झुंज
अहमद बिन अली स्टेडियम, दोहा, ता. ३ ः बलाढ्य अर्जेटिनाने आज चिवट लढा देणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा २-१ असा पराभव करीत आपली आगेकूच कायम ठेवली. ऑस्ट्रेलियाचा या स्पर्धेतील स्वप्नवत प्रवास या पराभवामुळे थांबला. अर्जेंटिनाकडून स्टार मेस्सी याने ३५ व्या मिनिटाला तर ज्युलिअन अल्वारेझने ५७ व्या मिनिटाला गोल केले. ऑस्ट्रेलियाच्या गोलरक्षकाने केलेली चूक दुसऱ्या गोलसाठी कारणीभूत ठरली तर अर्जेंटिनाच्या एन्झो फर्नांडेझकडून ७७ व्या मिनिटाला स्वयंगोल झाला. उत्तरार्धात ऑस्ट्रेलियाच्या दोन संधी दुर्दैवाने हुकल्या अन्यथा चित्र वेगळे असते.
स्टार फुटबॉलपटू व कर्णधार मेस्सीने ३५ व्या मिनिटाला कौशल्यपूर्ण गोल करीत अर्जेंटिनाला आघाडीवर नेले. मेस्सीने प्रथम डीच्या दिशेने फटका मारला. ऑस्ट्रेलियाचा दणकट बचावपटू हॅरी सॉटूरने डीच्या जवळ चेंडू हेड करून धोका टाळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पुन्हा चेंडू अर्जेंटिनाच्या खेळाडूंकडे गेला. मॅक ॲलिस्टिरने चेंडू डीच्या आत ओटामेंडीकडे सोपविला. त्याने तो मेस्सीकडे सोपवला. त्याने उजव्या बगलेतून डाव्या पायाने मारलेला जमिनीला समांतर फटका संरक्षक खेळाडूच्या पायातून गोलपोस्टमध्ये विसावला आणि समर्थकांनी एकच जल्लोष केला. पूर्वार्ध १-० असा संपल्यानंतर उत्तरर्धातही अर्जेटिनाने आक्रमणे सुरू ठेवली. त्यातही मेस्सीच्या ड्रिबलिंगचा अनोखा नजराणा पाहण्यास मिळत होता. मध्यरेषेपासून चेंडू घेऊन मेस्सी डीमध्ये एकटा घुसत होता. हा मेस्सी करिष्मा नेत्रदीपक होता. या दरम्यान ऑस्ट्रेलियाचा गोलरक्षक मॅट रायन दबावाखाली सामन्याच्या ५७ व्या मिनिटाला चूक करून बसला. संरक्षक फळीतील एकाकडून मिळालेल्या बॅक पास रायन नियंत्रित करू शकला नाही. त्याच्या आसपास दोन अर्जेटिनाचे खेळाडू चेंडूवर ताबा घेण्यासाठी धडपडत होते. डाव्या बगलेतून आत आलेल्या अल्वारेझने रायनकडून सुटलेल्या चेंडूवर ताबा मिळवत मोकळ्या गोलपोस्टमध्ये तो तडकावित गोल केला.
पूर्वार्धापेक्षा उत्तरार्धात ऑस्ट्रेलियाची आक्रमणे अधिक सूत्रबद्ध होती. त्याचे फळ त्यांना सामन्याच्या ७७ व्या मिनिटाला मिळाले. बदली खेळाडू म्हणून आलेल्या ग्रेग गुडविनने डाव्या बगलेतून आक्रमण केले. त्याने चेंडूचा ताबा घेत रक्षकाला भेदत मारलेला फटका फर्नांडेझच्या चेहऱ्यावर आदळून गोलपोस्टमध्ये विसावला. पहिल्यांदा गुडविनच्या नावावर हा गोल नोंद झाला; पण नंतर स्वयंगोलचा निर्णय ‘वार’ पंचांनी जाहीर केला. या गोलमुळे हुरुप वाढलेल्या ऑस्ट्रेलियाने आक्रमणांची गती वाढविली. ८० व्या मिनिटाला गुडविनने आणि जादा वेळेच्या शेवटच्या क्षणी गरंग कुओलने मारलेला फटका गोलमध्ये रुपातंर होता होता वाचला. कुओलचा फटका गोलरक्षकाच्या हातातच पडला. त्याक्षणी अर्जेटिनाच्या दोन्ही रक्षकांनी खाली पडलेल्या कुओलचा अक्षरशः मिठी मारत आनंद साजरा केला.
मॅरेडोनाला टाकले मागे
मेस्सीचा हा विश्वकरंडकातील नववा गोल होता. या गोलद्वारे मेस्सीने त्यांच्याच देशाचा स्टार फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना यांचा विश्वकरंडक स्पर्धेतील आठ गोलांचा उच्चांक मागे टाकला आहे. मेस्सीचा त्याचा करिअरमधील हा एकूण १००० वा सामना होता. आजपर्यंत त्याने ७८९ गोल केलेले आहेत.