डबल डेकर शहरात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डबल डेकर शहरात
डबल डेकर शहरात

डबल डेकर शहरात

sakal_logo
By

66532

शहरात धावली इलेक्ट्रिक डबल डेकर
चाचणीसाठी आली बस; केएमटीच्या आठवणींना उजाळा

कोल्हापूर, ता. ४ ः शहरातील रस्त्यावर आज अचानक डबल डेकर धावताना दिसल्याने शहरात २२ वर्षांपूर्वी बंद झालेल्या केएमटीच्या डबल डेकरच्या आठवणींना शहरवासीयांनी उजाळा दिला. मुंबईतील ‘बेस्ट’करिता चाचणीसाठी गेलेली ही ६५ आसन क्षमतेची इलेक्ट्रिक एसी बस चेन्नईला जाताना शहरात आली. तावडे हॉटेल ते कावळा नाका दरम्यान धावलेल्या बसमुळे अनेकांना आश्‍चर्याचा धक्का बसला.
खासदार धनंजय महाडिक यांनी या बसची पाहणी करून माहिती घेतली, तर आमदार सतेज पाटील यांनीही केएमटीला नवीन एसी बस देण्याचे नियोजन केल्याने त्यांनीही माहिती घेतली. मुंबईच्या ‘बेस्ट’च्या ताफ्यात पूर्वीपासून डबल डेकर आहेत. त्या पाहून केएमटीने २२ डबल डेकर खरेदी केल्या होत्या. मुंबईनंतर केवळ कोल्हापुरात डबल डेकर धावत होत्या. त्यामुळे पर्यटक, शहरवासीयांना त्याचे अप्रूप होते. स्पेअर पार्टची समस्या निर्माण झाल्यावर २००२ मध्ये या बस बंद करण्याचा निर्णय घेतला.
केएमटी पुन्हा नवीन बस घेत असल्याने तसेच तोट्याच्या विषयामुळे चर्चेत आली आहे. अशा स्थितीत मुंबईला चाचणीसाठी गेलेली अशोक लेलॅंड स्विच या कंपनीची ही बस तावडे हॉटेल पासून कावळा नाका येथील बसच्या कंपनीजवळ आली. तिथे काही काळ थांबून पुढे रवाना झाली. त्यावेळी खासदार महाडिक यांनी त्यांच्या कार्यालयाजवळ या बसची पाहणी केली. त्यांनी अशा इलेक्ट्रिक बसेस केएमटीच्या ताफ्यात घेण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.
माजी महापौर सुनील कदम, सहायक परिवहन अधिकारी मंगेश गुरव, नंदकुमार सावंत, केएमटीचे प्रकल्प अधिकारी पी. एन. गुरव आदी उपस्थित होते. बसमध्ये अत्याधुनिक सुविधा असून सीसीटीव्ही आहेत. साडेतीन कोटीची बस असून, एकदा चार्ज केल्यानंतर ५२० किलोमीटर धावते. बॅटरी चार्जिंग तासात होते.