
बिंदू चौक ते उमा टॉकिज रस्ता
66522
कॉमर्स कॉलेजसमोर
रस्ता, ड्रेनेज काम अर्धवटच
कोल्हापूर, ः विविध संघटनांनी आंदोलने केली, निवेदने दिली. शहरातून महापालिकेवर आगपाखड होऊ लागल्यानंतर प्रशासनाने तातडीने पॅचवर्कच्या कामांना सुरूवात केली. पण, दुर्गा हॉटेल ते उमा टॉकिजपर्यंतच्या रस्त्याची अवस्था ‘जैसे थे’ आहे. या रस्त्यावर पर्यटकांची संख्या मोठी असूनही या कामाकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्याचे दिसते. तसेच ड्रेनेज लाईनचे कामही अर्धवट केल्याने पर्यटकांना दुर्गंधी सहन करावी लागत आहे.
दुर्गा हॉटेल ते आझाद चौकापर्यंतच्या रस्त्यावरील ड्रेनेज लाईन जुनी असल्याने वारंवार तुंबत होती. त्यातून गटारीतून मैलायुक्त सांडपाणी वाहत राहून दुर्गंधी पसरत होती. नवरात्रीपूर्वी नवीन लाईन टाकली. तोपर्यंत कॉमर्स कॉलेजकडील अर्ध्या रस्त्याचे मोठ्या खडीचे काम केले. त्यानंतर रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष झाले आहे. ड्रेनेजलाईनचे काम केलेल्या भागात केवळ मोठी खडी पसरली आहे. त्यावरून चालताही येत नाही. ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. या रस्त्यावर प्रचंड वर्दळ आहे. त्यामुळे उडणाऱ्या धुळीमुळे श्वसनाचे विकार बळावत असल्याने सर्वांना दारे बंद करून बसावे लागत आहे. अर्धवट केलेल्या रस्त्याच्या कामाची चर्चा होत आहे.
ज्या ड्रेनेज लाईनसाठी रस्त्याचे काम केले गेले, ते कामही अर्धवटच आहे. आझाद चौकातून दुर्गा हॉटेलपर्यंत नवीन लाईन टाकली. तिथून बिंदू चौकाच्या दिशेने लाईन टाकायची आहे. ते काम रखडले आहे. त्यामुळे आझाद चौकापासून लाईनमधून येणारे सांडपाणी तुंबून पुन्हा पहिल्यासारखी दुर्गंधी सुटत आहे. त्यासाठी दर आठवड्याने महापालिकेचे जेट मशीन आणून ती लाईन साफ करावी लागत आहे. प्रचंड वर्दळीच्या या रस्त्यावर पर्यटक ये-जा करत असताना दुर्गंधी व पायाला टोचणारी खडी यामुळे वैतागत आहेत. या महिन्यात पर्यटक मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे किमान या रस्त्यावरील अडचणी तत्काळ सोडवणे गरजेचे आहे.
चौकट
महापालिकेचा ताकतुंबा
ड्रेनेज, रस्त्याच्या कामाबाबत स्थानिक नागरिक श्रीनिवास मिठारी पाठपुरावा करत होते. गेल्या काही दिवसांपासून महापालिकेचे अधिकारी त्यांचा ताकतुंबा करत आहेत. पर्यटकांना शहराची ओळख या एका रस्त्यावरून होत असल्याने किमान हा रस्ता तरी व्यवस्थित करावा, अशी त्यांची मागणी आहे.