सहा कर्मचाऱ्यांवर चालतोय कारभार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सहा कर्मचाऱ्यांवर चालतोय कारभार
सहा कर्मचाऱ्यांवर चालतोय कारभार

सहा कर्मचाऱ्यांवर चालतोय कारभार

sakal_logo
By

सहा कर्मचाऱ्यांवर चालतोय कारभार
आजरा पाटबंधारे विभाग; शेतकऱ्यांना सेवा देणेत अडचणी, कार्यक्षमतेवर परिणाम
रणजित कालेकर ः सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. ४ ः तालुक्यातील पाटबंधारे विभागाची पदे सतर टक्के रिक्त आहेत. त्यामुळे केवळ सहा जणांवर या विभागाचा कारभार सुरू आहे. शेतकऱ्यांना वेळवर सेवा देण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची धावपळ होत आहे.
दैनंदिन कामकाजाबरोबर अन्य अनुषंगिक कामे करताना अडचणी वाढल्या आहेत. अपुरे कर्मचारी असल्यामुळे कामाचा ताण वाढला असून कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत आहे. आजरा तालुका डोंगराळ व दुर्गम तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात ९६ गावे असून यामध्ये बहुतांश वाड्या वसाहती आहेत. काही वर्षात तालुक्यात मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पाणीसाठा झाला आहे. सुमारे दहा हजार हेक्टर भिज क्षेत्र झाले असून दरवर्षी बागायती क्षेत्रात वाढ होत आहे. शेतकरी विविध पीक घेत आहेत. पाटंबधारे विभागाला अपुऱ्या कर्मचाऱ्यामुळे त्यांना वेळेवर पाणी व सेवा पुरविण्यात अडचणी येत आहेत.
तालुक्यात पाटबंधारे विभागाकडे कृष्णा खोरे अंतर्गत आजरा शाखा (चित्रीसह हिरण्यकेशीवर बंधारे), लघु पाटबंधारे शाखा (धनगरमोळा, खानापूर, एरंडोळ व उचंगी प्रकल्प) व सर्फना आंबेओहोळ शाखा या तीन शाखा आहेत. या शाखांकडे शाखाधिकाऱ्यांसह पाच कर्मचारी कार्यरत आहे. या तीन शाखेचा आकृतीबंध २२ असून १६ पदे रिक्त आहेत. कालवानिरीक्षक ७ पैकी ३, मोजणीदार ७ पैकी ०, चौकीदार ७ पैकी १ व शिपाई १ पैकी १ व दप्तर कारकून १ पैकी ० अशी पदसंख्या कार्यरत आहे. पाणी नियोजन व व्यवस्थापन, पाणी परवाने, शेतकऱ्यांना पाणी देणे, दिलेल्या पाण्याची आकारणी व वसुली करणे यांसह विविध अनुषंगिक कामे करावी लागतात. निवडणुका, पूरनियंत्रण यासारखी अन्य शासकीय कामेही करावी लागतात. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला असून त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत आहे. त्यामुळे या विभागातील रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
---------
पाच शाखांचा कारभारी एक
आजरा तालुक्यातील आजरा, लघु पाटबंधारे व सर्फनाला आंबेओहोळ या तीन शाखा तर गडहिंग्लज तालुक्यातील हिरण्यकेशी व लघु पाटबंधारे या दोन शाखांचा कारभार हा एका शाखाधिकाऱ्यांकडे आहे. चार शाखांचे शाखाधिकारी पद रिक्त आहे. त्यामुळे आजरा पाटबंधारे शाखाधिकाऱ्यांना कसरत करावी लागत आहे.

* तरीही विक्रमी वसुली
आजरा पाटबंधारे विभागाचा कारभार अपुऱ्या कर्मचाऱ्यांवर चालत असला तरी या विभागाची वसुली विक्रमी आहे. सुमारे १०६ टक्के गतवर्षी वसुली झाली आहे. त्यामुळे या विभागाच्या कामाचे कौतुक होत असते.