पान २ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान २
पान २

पान २

sakal_logo
By

बिनविरोधातून जपला सामाजिक सलोखा

गडहिंग्लज तालुका : बटकणंगले, कडलगे गावाचा आदर्श

सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज : तालुक्यातील बटकणंगले, कडलगे ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्याचे अर्ज दाखलच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट झाले. आता केवळ औपचारिक घोषणाच बाकी राहिली आहे. या बिनविरोधच्या माध्यमातून गावात सामाजिक सलोखा जपण्याचा प्रयत्न झाला आहे.
गावची निवडणूक म्हणजे पराकोटीची ईर्ष्याच असते. गट-तट असो अगर भाऊबंदकी यांच्यातील संघर्षात सामान्य माणूस मात्र हतबल होत असल्याचे पाहायला मिळते. जुने हेवेदावे या निमित्ताने उफाळून येतात. पदापेक्षा वैयक्तिक प्रतिष्ठेला महत्त्व दिले जाते. यातूनच गावातील सामाजिक स्वास्थ्य बिघडण्यासह सलोख्यालाही तडा जाऊ लागतो. त्याचा विपरित परिणाम गावच्या प्रगतीवरही होतो.
गडहिंग्लज तालुक्यातील ३४ ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने वातावरण तापले आहे. थेट सरपंच निवडीमुळे या पदासाठी इच्छुक वाढले आहेत. सर्वत्र, गावच्या निवडणुकीत एकमेकाला पाणी पाजायची भाषा सुरू असताना बटकणंगले, कडलगे गावातील राजकीय पक्ष, गटातटाच्या प्रमुखांनी मात्र एकत्र येत निवडणूक बिनविरोध करून आदर्श निर्माण केला आहे. बटकणंगलेचे सरपंचपद ओबीसी सर्वसाधारण तर कडलगेत सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहे. या पदावर अनुक्रमे धोंडिबा सुतार व रूपाली पाटील यांचे एकमेव अर्ज असल्याने अधिकृत घोषणा करणेच बाकी आहे. दोन्ही गावांत प्रत्येकी ९ सदस्यही बिनविरोध झाले. दरम्यान, कडाल गावचे ओबीसी सर्वसाधारण सरपंच पदही बिनविरोध झाले आहे. रोहिदास सुतार यांचा एकमेव अर्ज आहे. सदस्य पदासाठी मात्र ७ जागेसाठी १४ अर्ज आहेत.
अलीकडील निवडणुका पैशाशिवाय नाहीत, हे आता सर्वांनाच उमगले आहे. केवळ ईर्ष्येतून नको त्या गोष्टीवर होणाऱ्या वारेमाप खर्चाला आळा घालणे गरजेचे बनले आहे. गावातील संघर्ष टाळून सामाजिक सलोखा वाढविणे आणि आर्थिक उधळपट्टीला आळा घालणे, या हेतूने ही गावे बिनविरोध झाली आहेत. यावरून आता संघर्ष नको असल्याची मानसिकता वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. हे गावच्या सामाजिक सलोख्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल आहे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
..

चौकट
ग्रामस्थांची वाढते जबाबदारी
गावातील सर्व गटतट व राजकीय कार्यकर्ते एकत्र येऊन निवडणूक बिनविरोध केली, हे चांगलेच आहे. बिनविरोधामुळे आता गावात विरोधक राहत नाहीत. अशावेळी ग्रामस्थांवरील जबाबदारी वाढते. ग्रामपंचायत कारभारावर अंकुश ठेवणे आणि विकासाला चालना देऊन गावची प्रगती साधून घेण्यात ग्रामस्थांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. म्हणून ग्रामस्थांना जागल्याची भूमिका वटवावी लागेल.