
वाज दरवाढीला ठामपणे विरोध करावा : होगाडे
वीज दरवाढीला ठामपणे
विरोध करावा : होगाडे
महावितरणच्या याचिकेच्या पार्श्वभूमीवर आवाहन
इचलकरंजी, ता. ५ : वीज नियमक आयोगासमोर महावितरण कंपनीची दरवाढ मागणी याचिका दाखल झाली आहे. येत्या मार्चमध्ये त्यावर निर्णय होणार असून नवीन दर हे एप्रिलपासून पुढील दोन वर्षासाठी असणार आहेत. यामध्ये सरासरी १० ते १८ टक्के म्हणजे ७५ ते १३० पैसे प्रती युनिट इतकी दरवाढीची शक्यता आहे. या दरवाढीला ग्राहक व औद्योगिक संघटनांनी ठामपणे विरोध करावा, असे आवाहन महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी केले आहे.
बहुवर्षीय दरनिश्चिती विनियमानुसार तिसऱ्या वर्षी नोव्हेंबर अखेरपर्यंत आयोगासमोर फेरआढावा याचिका दाखल करून फरकाची मागणी करता येते. त्यानुसार महावितरण कंपनीची दरवाढ मागणी याचिका दाखल झालेली आहे. या याचिकेची राज्यात महसुली विभागनिहाय सहा ठिकाणी जाहीर सुनावणी होईल. महावितरण व महानिर्मिती या कंपन्यांची अकार्यक्षमता, प्रामाणिकपणा व इच्छाशक्तीचा अभाव, चोरी आणि भ्रष्टाचारयुक्त कारभार यांचा एकूण परिणाम हा गेल्या जूनपासून लागू झालेल्या दरमहा सरासरी १ रुपये ३० पैसे प्रति युनिट या इंधन समायोजन आकारामुळे राज्यातील सर्व जनतेला पूर्णपणे कळलेला आहे. याचीच पुनरावृत्ती येत्या मार्चच्या निकालामध्ये होईल यामध्ये शंका दिसत नाही.
परिणामी राज्यातील सर्वसामान्य व प्रामाणिक वीज ग्राहकांवर अनावश्यक बोजा लादला जाणार आहे. त्याचबरोबर अतिरेकी औद्योगिक वीज दरामुळे औद्योगिक व आर्थिक विकासाला घातक अडथळे निर्माण होतील, अशी परिस्थिती तयार होणार आहे. राज्य सरकारलाही यामुळे जनतेच्या अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागणार आहे. राज्य सरकार, आयोग आणि वीज कंपन्या या सर्वांनीच गांभीर्याने आणि प्रामाणिकपणे या प्रश्नाकडे पाहणे व ग्राहक हित व राज्याचा विकास नजरेसमोर ठेवून निर्णय घेणे हेच राज्याच्या हिताचे ठरणार आहे. हे सरकारने व कंपन्यानी करावे. त्याचबरोबर राज्यातील सर्व वीज ग्राहकांनी दरवाढीच्या विरोधात प्रचंड संख्येने सूचना व हरकती दाखल कराव्यात, प्रसंगी आंदोलने व निदर्शने करावीत, असे होगाडे यांनी पत्रकात नमूद केले आहे.