
कोरोनानंतर आता मराठी चित्रपटांचेही शुटींग
66783
मराठी चित्रपटांच्या शूटिंगला प्रारंभ
विविध लोकेशन्सवर शेड्यूल, स्थानिक कलाकारांनाही संधी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ५ ः कोरोना लॉकडाउनच्या लाटेत बंद पडलेल्या मराठी चित्रपटांच्या शूटिंगलाही आता येथील विविध लोकेशन्सवर प्रारंभ झाला आहे. लॉकडाउन काळात मालिकांचे शूटिंग परराज्यात गेले. मात्र, निर्बंध शिथिल होताच ते पुन्हा चित्रनगरीसह विविध लोकेशन्सवर सुरू झाले. पण, एखाद्या मराठी चित्रपटाच्या शूटिंगचे संपूर्ण शेड्यूल आता पहिल्यांदाच येथील विविध लोकेशन्सवर लागले आहे. प्रसिद्ध अभिनेता किशोर कदम, नंदा शिंदे-रणदिवे यांच्याबरोबरीने स्थानिक कलाकारांनाही या चित्रपटात संधी मिळाली आहे.
कोरोना लॉकडाउन आणि त्यानंतरच्या काळात हिंदी-मराठी मालिका, जाहिराती आणि काही वेबसीरिजसाठी काही लोकेशन्सवर शूटिंग झाले आणि काही मालिकांचे शूटिंग अजूनही सुरू आहे. कोल्हापूर चित्रनगरीत लवकरच आणखी काही मोठे प्रोजेक्ट येणार असून, त्याची बोलणी अंतिम टप्प्यात आहेत. मात्र, बरेचसे तयार मराठी चित्रपट प्रदर्शितच न झाल्याने नव्या चित्रपटांसाठीही फारसे कुणीच अनुकूल नव्हते. या पार्श्वभूमीवर स्थानिक निर्माते विलासराव वाघमोडे, उमेश वाघमोडे यांनी नवीन चित्रपटाचा प्रोजेक्ट हाती घेतला असून, त्याचे सर्व शूटिंग शहर आणि जिल्ह्यातील विविध लोकेशन्सवरच होणार आहे.
दरम्यान, या चित्रपटाच्या शूटिंगला आजपासून प्रारंभ झाला. या वेळी श्री. वाघमोडे, उमेश वाघमोडे, चित्रपट महामंडळाचे माजी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर, कृष्णा कांबळे, नंदकुमार पाटील, सतीश बिडकर, रणजित जाधव, लेखक सुनील माने, धनाजी यमकर, रवी गावडे आदी उपस्थित होते.
दरम्यान, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना आदरांजली वाहून शूटिंगला प्रारंभ झाला.