
महागाव पोलिस चौकीची गरज
महागावला पोलिस चौकीची गरज
मोठ्या लोकवस्तीचे गाव; लोकप्रतिनिधींनी लक्ष घालणार का?
गणेश बुरुड : सकाळ वृत्तसेवा
महागाव, ता. ७ : तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महागाव मोठ्या लोकवस्तीचे गाव आहे. शेजारील १५ हून अधिक खेड्यांचा केंद्रबिंदू म्हणून या गावची ओळख आहे. संत गजानन महाराज शिक्षण समूहामुळे हे गाव जिल्हाच्या ग्रामीण भागातील नवे शैक्षणिक हब म्हणून नावारूपाला येत आहे. महागावात स्थानिक पातळीवर तक्रारीचे निवारण करण्यासाठी महागावला पोलिस चौकीची गरज भासू लागली आहे. त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणे गरजेचे आहे.
सध्या गडहिंग्लजला एक पोलिस स्टेशन व शहरासाठी पोलीस चौकी, हलकर्णीत पोलिस दूरक्षेत्र व नेसरी भागासाठी पोलिस स्टेशन कार्यरत आहे. पाच वर्षांपूर्वी महागाव यात्रेच्या पार्श्वभूमीवर तात्पुरती चौकी उभारली होती. त्यासाठी महागाव ग्रामपंचायतीच्या इमारतीतील गाळा दिला होता. पण यात्रा संपल्यानंतर एक महिन्यानंतर चौकी बंद करण्यात आली.
महागावला दर सोमवारी आठवडा बाजार भरतो. बाजारासाठी दहा ते बारा गावांतील लोक येतात. तसेच महागावसह लागून असलेल्या गावासाठी राष्ट्रीयीकृत बॅंक आहे. इतर बँक व पतसंस्था कार्यरत आहेत. त्यामुळे लहान मोठे व्यवहार होत असतात. महागाव शैक्षणिक हब म्हणून नावारुपाला आले आहे. स्थानिक तक्रारींच्या निवारणासाठी जनतेला गडहिंग्लजला जावे लागते. यात वेळ व पैशाचा अपव्यय होतो. महागावसह दहा ते पंधरा खेड्यांतील नागरिकांसाठी पोलिस चौकीची गरज ठळक बनली आहे.
चौकट
महागावचा चौफेर विस्तार
राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या गावचा चौफेर विस्तार होत आहे. गारमेंट, बँका, पतसंस्था, जिल्हा बँकेची शाखा, प्राथमिक, माध्यमिक शाळा, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, शिक्षणशास्त्र महाविद्यालयांसह संत गजानन महाराज शिक्षण समूहातंर्गत येणारी विविध महाविद्यालये कार्यरत आहेत.
कोट...
महागाव मध्यवर्ती ठिकाण आहे. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे. आठवडा बाजार, शाळा महाविद्यालयामुळे विद्यार्थीसह लोकांची ये-जा वाढली आहे. त्यामुळे भविष्यात उद्भवणाऱ्या समस्यांचा स्थानिक स्तरावरच निपटारा होण्यासाठी पोलिस चौकी आवश्यक आहे.
- अण्णासाहेब पाटील, महागाव