राज्य नाट्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्य नाट्य
राज्य नाट्य

राज्य नाट्य

sakal_logo
By

लोगो - राज्य नाट्य स्पर्धा
----

फोटो 67069

मानवी मनोव्यापाराचा
वेध घेणारं
‘ब्रेकिंग न्यूज’

यंदाच्या स्पर्धेत विद्यासागर अध्यापक यांनी लिहिलेलं ‘ब्रेकिंग न्यूज’ हे तिसरं नाटक मंगळवारी सादर झाले. मानवी मनोव्यापाऱ्याचा सर्वांगीण वेध घेणाऱ्या या नाटकाचा तितकाच चांगला प्रयोग नृसिंह दोस्त मंडळाच्या टीमनं सादर केला. माणसाच्या मनात नेमकं काय चाललंय हे जाणून घेणं तसं फार अवघड. याच अनुषंगाने अनेक संशोधनही झाली आणि त्यातून वेगवेगळे निष्कर्षही पुढे आले. स्किझोफ्रेनिया झालेल्या अशाच एका रोहितच्या घरात ‘ब्रेकिंग न्यूज’ हे संपूर्ण नाटक घडते.
स्किझोफ्रेनिया हा तसा एक गंभीर आजार. सततच्या विचारामुळे आलेलं गोंधळलेपण, भ्रम, भास आणि त्यातून एकूणच वर्तनात होत जाणाऱ्या बदलांमुळे मनातील संशय अधिक बळावत जाणं, अशी या आजाराची विविध लक्षणं. रोहित एका केमिकल कंपनीत कामाला आहे आणि तो स्किझोफ्रेनियाचा बळी ठरलेला आहे. साहजिकच सतत टीव्ही पाहणं आणि त्यातही ब्रेकिंग न्यूजच्या तो आहारी गेला आहे. त्यातून त्याच्यातील नकारात्मकता आणखीच वाढते आहे. स्वतःच्या पत्नी अस्मितावरही तो संशय घेऊ लागतो आणि त्यातून मग वाद सुरू होतात. अस्मिता त्याला सोडून माहेरी निघून जाते. या साऱ्या पार्श्वभूमीवर रोहितवर त्याच्या कंपनीतील बॉसच्या खुनाचा आरोप ठेवत नचिकेत सीआयडी ऑफिसर म्हणून चौकशी करण्याच्या निमित्ताने घरात येतो आणि मग तपासादरम्यान रोहितच्या मनातील गुंता सोडवण्यासाठी तो प्रयत्न करतो. मात्र, रोहित नचिकेतलाच खुनात अडकवण्याचा प्रयत्न करतो. या साऱ्या भास-आभासांच्या गर्तेतून रोहितला सोडवण्यासाठी अस्मितानेच मनोविकारतज्ज्ञ असलेल्या नचिकेतला सीआयडी ऑफिसर बनवून घरी पाठवलेले असते. त्याच्या उपचारांचा रोहितवरही परिणाम होतो आणि रोहित व अस्मिताचा संसार पुन्हा नव्या उमेदीनं सुरू होतो...असं नाटकाचं कथासूत्र. मात्र, वर्तमानाचा विचार केला तर टीव्हीनंतर आता मोबाईलचं फॅड अधिक वाढलं आहे. त्यातही लहान मुलांतील हे प्रमाण अधिक आहे. घराघरांतील तो एक चिंतेचा विषय बनला आहे. या पार्श्वभूमीवरही अशा नाटकांची गरज वारंवार अधोरेखित होत राहते.
...........
पात्रपरिचय
-प्रमोद नाईक (रोहित), मानसी मांगोरे-पाटील (अस्मिता), सागर पेंडसे (नचिकेत).
-दिग्दर्शन व प्रकाशयोजना ः संदेश बारापात्रे, - नेपथ्य ः शिवराज आणेकर, -पार्श्वसंगीत ः सूरज कोळी, प्रसाद बांदिवडेकर,-रंगमंच व्यवस्था ः यश बारापात्रे, अथर्व गोडसे, यश बुरूंग, - वेशभूषा ः वर्षा बारापात्रे, देवयानी बारापात्रे,- रंगभूषा ः आरती कांबळे.
...............
आजचे नाटक
- जंगल जंगल बटा चला है
- परिवर्तन कला फाउंडेशन, कोल्हापूर
- संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह, सायंकाळी सात वाजता