ग्रामपंचायत वातावरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामपंचायत वातावरण
ग्रामपंचायत वातावरण

ग्रामपंचायत वातावरण

sakal_logo
By

गावागावांत उडणार प्रचाराचा धुरळा

लढतीचे चित्र स्पष्ट ः प्रचारासाठी मिळणार दहा दिवस

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ ः ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारी अर्ज माघारीची मुदत आज संपल्याने गावागावांतील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. परिणामी निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायतीत आता प्रचाराचा धुरळा उडणार आहे. या निवडणुकीचे मतदान १८ डिसेंबरला होणार आहे. १६ डिसेंबर रोजी जाहीर प्रचाराची सांगता होणार असल्याने प्रचारासाठी अवघे दहा दिवसच उमेदवारांना मिळणार आहेत. या काळात प्रत्येक मतदारांपर्यंत जाण्याचा प्रयत्न उमेदवारांचा असेल.
जिल्ह्यातील ४७४ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. याबरोबरच लोकनियुक्त सरपंच पदाचीही निवडणूक होत आहे. ४७४ सरपंच पदासाठी २६४४ तर १९५० सदस्यपदांसाठी १६ हजार ३५३ अर्ज वैध ठरले होते. आज अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी गावनिहाय लढतीचे चित्र स्पष्ट झाले. त्यामुळे उद्यापासून गावागावांत प्रचाराचे रान उठणार आहे.
विधानसभेचा निकाल फिरवणाऱ्या गावांची निवडणूक या टप्प्यात होत आहे. त्यातही बहुंताशी गांवे ही मोठी आहेत. त्यामुळे अशा गावांत आपल्याच गटाची सत्ता यावी यासाठी नेत्यांनी कंबर कसली आहे. पक्षीय पातळीवर जरी ही निवडणूक होत नसली तरी गाव पातळीवर कोण कोणाचा उमेदवार याची माहिती असते. त्यामुळे नेतेही थेट प्रचारात न उतरता आपल्या गटाच्या मागे गावची रसद कशी लागेल यासाठी प्रयत्नशील आहेत. काही गावांत पारंपरिक विरोधक एकत्र आले आहेत तर काही ठिकाणी असलेल्या गटांत दोन गट पडले आहेत. त्यामुळे कोणाची नाराजी ओढवून घेण्यापेक्षा अप्रत्यक्षरित्या आपल्या गटाच्या मागे ताकद लावण्याचा नेत्यांचा प्रयत्न असेल.
गाव पातळीवर भावकीतील गठ्ठा मतांवर उमेदवारांचा डोळा असेल. ही मते मिळवण्यासाठी भाविकातील प्रमुखांवर नेत्यांसह उमेदवारांचे लक्ष असेल. याशिवाय गावांत ‘शब्द’ प्रमाण असलेल्या व्यक्तींची मोठी संख्या आहे, अशांचाही पाठिंबा मिळवणे उमेदवारांच्यादृष्टीने आव्हान असेल. या निवडणुकीच्या निमित्ताने गावागावांतील गटा-तटाच्या राजकारणाचे पैलूही पहायला मिळणार आहे.
............

रविवार ठरणार ‘सुपर संडे’
या निवडणुकीच्या जाहीर प्रचारासाठी येणारा रविवार (ता. ११) हा एकमेव सुटीचा दिवस मिळणार आहे. पुढच्या रविवारी (ता. १८) या निवडणुकीचे मतदानच असल्याने ११ तारखेचा रविवार प्रचाराचा ‘सुपर संडे’ ठरणार आहे. त्यादिवशी पदयात्रा, सभांनी वातावरण ढवळून निघण्याची शक्यता आहे.
........