
Gag71_txt.txt
67227 गगनबावडा : गगनगडावरील पालखी सोहळ्याचे दृश्य.
....
गगनगडावर पालखी सोहळा
गगनबावडा, ता. ७ः ‘गगनगडाच्या शिखरावरती घुमतो जय जयकार, प्रकटला दत्ताचा अवतार’ अशी धारणा उराशी बाळगून बुधवारी हजारो भाविकांनी गगनबावडा येथील गगनगडावर दत्त जन्माचा अपूर्व सोहळ्याचा आनंद लुटला. गगनगिरी महाराजांची तपोभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येथील दत्त जन्म सोहळ्याला आगळे वेगळे महत्त्व आहे.
गगनगडावर सलग चार दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून, आज दत्त जयंती सोहळ्याचा मुख्य दिवस होता. पठारावर दुपारनंतर मुख्य सोहळ्यास सुरुवात झाली. गगनगड पठारावर उभारलेल्या शामियान्यात सायंकाळी मावळतीला निघालेल्या सूर्याला साक्ष ठेवत हा विलोभनीय सोहळा ''याची डोळा याची देही'' पाहण्यासाठी पठारावर भाविकांची मांदियाळी जमली होती. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो भाविक व पायी दिंड्यांनी गगनगड फुलून गेला आहे. भाविकांचे लोंढेच्या लोंढे दिवसभर गगनगडाची वाट चढत होते. सहायक पोलिस निरीक्षक रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. खास दत्त जयंतीनिमित्त एसटी महामंडळाच्या जादा तीन गाड्या सतत फेऱ्या मारत आहेत.