
विशाळगड
67222
....
विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे हटवा :
संभाजीराजे छत्रपती
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ : विशाळगडावर असणारी अतिक्रमणे काढण्यासाठी आठ-दहा दिवसांचा अधिक वेळ घ्या, पण एकदा सुरू केल्यानंतर सरसकट अतिक्रमणे निघालीच पाहिजेत. हिंदू-मुस्लिम असा भेदभाव न करता ज्यांनी ज्यांनी अतिक्रमणे केली आहेत. त्या सर्वांची अतिक्रमणे काढून विशाळगडला मुक्त श्र्वास घेऊ द्या. विशाळगडसाठी दिलेल्या ६ कोटी रुपयांच्या निधीची कामे दर्जाहीन आणि सुमार झाली आहेत, याची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज केली.
विशाळगड अतिक्रमणमुक्त करण्यासाठी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या पुढाकाराने विशाळगड, गजापूर ग्रामस्थ आणि शिवप्रेमींची जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठक झाली. यावेळी ते बोलत हाते.
संभाजीराजे छत्रपती म्हणाले, ‘‘विशाळगडवर मोठमोठ्या इमारती होत आहेत. या इमारती कोण बांधतेयं, त्याला पैसा कोठून येतो, याची चौकशी झाली पाहिजे. विशाळगडाचा इतिहास पुसून अवैध व्यवसाय केला जात आहे. कोंबडे, बकऱ्यांची कत्तल करून विशाळगडवर दुर्गंधी पसरली जात आहे. या गडावर मूळ जे लोक आहेत, त्यांनी रहायला हरकत नाही; पण बाहेरच्या ठिकाणाहून आलेल्या लोकांना तेथून इतरत्र हलवले पाहिजे.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, ‘‘विशाळगडावरील अतिक्रमाणाबाबत ग्रामस्थ आणि शिवप्रेमींनी सकारात्मक चर्चा केली आहे. यातून ज्यांनी अतिक्रमण केले आहे. ते अतिक्रमण काढण्यासाठी महाशिवरात्रीच्या आधीपासूनच प्रक्रिया सुरू केली जाईल. यामध्ये कोणताही भेदभाव होणार नाही. ज्याने बेकायदेशीर अतिक्रमण केले आहे. ते अतिक्रमण गडावरून निघाले पाहिजे, यासाठी नियोजन केले जाईल.’’
जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे म्हणाले, ‘‘विशाळगडावर अवैध व्यवसाय होऊ नये. मद्य घेऊन जावू नये यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात केला जाईल. तसेच, अवैध व्यवसायाची गुप्तचर विभागाकडून चौकशी केली जाईल. यासाठी सुरक्षा तैनात केली जाईल.’’
सह्याद्री इतिहास संशोधन केंद्राचे इंद्रजित सावंत म्हणाले, ‘‘विशाळगड हे प्रेरणास्थान आहे. या ठिकाणी मनमानी अतिक्रमण होणे चुकीचे आहे. ही अतिक्रमणे काढून या गडाचे संवर्धन झाले पाहिजे.’’
हर्षल सुर्वे म्हणाले, ‘‘गडावर अतिक्रमणासोबत मूळ दर्गा सोडून त्याचे सुशोभीकरण केले आहे. त्यामुळे या ठिकाणी मूळ दर्गाच राहिला पाहिजे. इतर सुशोभीकरण आणि अतिक्रमण काढले पाहिजे.’’
विशाळगडचे माजी उपसरपंच आयुब कागदी म्हणाले, ‘‘गडावर अतिक्रमण झाले आहे. पण, हे अतिक्रमण काढून घेतले जाईल. पण पन्नास-साठ वर्षांपासून या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना कायम केले पाहिजे.’’
बंडू भोसले म्हणाले, ‘‘गडाचे बुरुज पाडून अतिक्रमण केले आहे. बाहेरील राज्यातील लोक गडावर येतात कसे आणि त्याचे अतिक्रमण होतेच कसे?’’ या वेळी दिलीप देसाई, किशोर घाटगे, आझाद नायकवडी, केतन वेल्हाळ, प्रमोद सावंत, बंडा साळोखे, किशोर घाटगे, राम यादव, अमित आडसुळे उपस्थित होते.
..
६ कोटींची दर्जाहीन कामे
विशाळगडसाठी दिलेल्या ६ कोटी रुपयांच्या निधीतून केलेली कामे सुमार आणि दर्जाहीन आहेत. याला पुरातत्त्व विभाग जबाबदार आहे. एकही काम विशाळगडला साजेशे नाही. संबंधित अधिकारी आणि ठेकेदाराची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी करत ‘पुरातत्त्व’चे अधिकारी वाहने यांना संभाजीराजे यांनी धारेवर धरले.
....