
निवडणुकीसाठी कर्नाटकचे नाटक ः मुश्रीफ, बंटी पाटील टिका
(फोटो - ६७२२०)
निवडणुकीसाठी बोम्मईंचे षड्यंत्र
मुश्रीफ, सतेज पाटील यांची टीका
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ ः महाराष्ट्र आणि कर्नाटक यांचा सीमावाद सर्वोच्च न्यायालयात असताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई बेताल वक्तव्ये करत आहेत. कर्नाटकात पुढील दोन महिन्यांत निवडणुका लागणार आहेत. या निवडणुकीत भाजपचा पराभव नक्की आहे. त्यामुळेच आपल्या अपयशावरचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी त्यांनी हे षड्यंत्र रचले आहे, अशी टीका माजी मंत्री हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी केली. शासकीय विश्रामगृहाच्या शाहू सभागृहात झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत ते बोलत होते. कर्नाटक सरकारचा निषेध करण्यासाठी शनिवारी (ता.१०) दुपारी ११ वाजता शाहू समाधिस्थळावर आंदोलन करण्याची घोषणा या वेळी करण्यात आली.
कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावरून सध्या वादंग सुरू आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठक झाली. या वेळी माजी महापौर आर. के. पोवार यांनी प्रास्ताविक केले. या वेळी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, ‘‘मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांनी बेळगावात जाण्याची घोषणा करून माघार घेतली. त्यांनी सीमाभागातील मराठी जनतेचे खच्चीकरण केले आहे. जनता हे विसरणार नाही. कर्नाटकला कोल्हापुरी हिसका दाखवलाच पाहीजे.’’
माजी मंत्री सतेज पाटील म्हणाले, ‘‘कर्नाटकची निवडणूक दोन महिन्यांमध्ये लागेल. बोम्मई सरकारचा कारभार भ्रष्ट आहे. ४० टक्के कमिशन घेणारे सरकार अशी तेथे टीका होते. आपले अपयश झाकण्यासाठी आणि लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी पुन्हा सीमावादाचा मुद्दा पुढे केला आहे. हे बोम्मई यांचे षड्यंत्र आहे. एकाने मारायचे आणि दुसऱ्याने रडल्यासारखे करायचे ही राज्य सरकारची भूमिका आहे. सीमाभागातील मराठी भाषिकांना आधार देण्याची भूमिका भाजप सरकारची नाही. कोल्हापूरने सीमावासीयांसाठी नेहमीच तटबंदी उभी केली. दिवंगत प्रा. एन. डी. पाटील सरांच्या पश्चातही कोल्हापूरकर सीमाभागातील मराठी भाषिकांच्या मागे खंबीरपणे उभे राहतील.’’
माजी मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, ‘‘महाजन आयोगाने महाराष्ट्रावर अन्याय केला. मराठी भाषिक गावे कर्नाटकात गेली, ही गोष्ट पटल्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राची याचिका दाखल करून घेतली. अन्यथा ती फेटाळली असती. असे असताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणतात, कर्नाटकच्या बाजूने निकाल लागेल. कर्नाटकात त्यांची सत्ता जाणार हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे. त्यामुळेच हे षड्यंत्र रचले आहे. राज्यपाल, भाजप प्रवक्ते द्विवेदी, मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार प्रसाद लाड हे सर्व सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत आहेत. याचा निषेध आपण शाहू महाराजांच्या समाधीसमोर करणार आहे.’’
या वेळी आमदार ऋतुराज पाटील, जयश्री जाधव, विजय देवणे, शारंगधर देशमुख, आदिल फरास, दुर्वास कदम, संजय पोवार-वाईकर, अनिल साळोखे, मनजित माने यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----------------------------------------------------------
राज्यपालांच्या बैठकीचा अहवाल मागवा
सतेज पाटील म्हणाले, ‘‘पहिल्यांदाच केंद्राच्या सूचनेनुसार दोन्ही राज्यांच्या राज्यपालांची बैठक झाली. या बैठकीतच या वादाचे पहिले पाऊल टाकले गेले होते का? यासाठी या बैठकीचा जो अहवाल केंद्राला पाठवला आहे, तो जनतेसमोर आला पाहीजे.’’ दरम्यान, सध्याच्या या तणावाच्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर सौंदत्ती डोंगरावर गेलेल्या रेणुका भाविकांची योग्य ती सुरक्षा घेण्याबाबत संबंधितांना निर्देश द्यावेत, अशी मागणी करणारे पत्र बेळगावच्या जिल्हा पोलिसप्रमुखांना पाठवले असल्याचेही त्यांनी सांगितले.