ग्रामपंचायत अर्ज माघार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामपंचायत अर्ज माघार
ग्रामपंचायत अर्ज माघार

ग्रामपंचायत अर्ज माघार

sakal_logo
By

४१ गावांचे सत्ताधारी ठरले
---
२३ सरपंच, ४९१ सदस्य बिनविरोध
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ : जिल्ह्यात सुरू असलेल्या ४७४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत आज ४१ ग्रामपंचायती बिनविरोध विजयी झाल्याचे स्पष्ट झाले. त्याशिवाय, २३ सरपंच तसेच ४९१ हून अधिक सदस्यांनीही बिनविरोध होण्याचा मान मिळविला आहे. अर्ज माघारीच्या दिवशी चित्र स्पष्ट झाले. त्यामुळे एकीकडे गावागावांत इर्ष्येचे राजकारण पेटणार असले, तरी दुसरीकडे बिनविरोध झाल्याचा आनंदोत्सव साजरा केला जात आहे.
अर्ज माघारीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ग्रामपंचायत विभागाकडून रात्री बारापर्यंत आकड्यांची जुळवाजुळव केली जात होती. प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याने डोळ्यांत तेल घालून काम करावे लागत असल्याचे चित्र आहे. ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबरला मतदान आणि २० डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
जिल्ह्यातील ४७४ ग्रामपंचायतींमधील एक हजार ६५० प्रभागांत निवडणूक होत आहे. यात ४७४ सरपंच आणि चार हजार ४०२ सदस्य निवडून द्यायचे आहेत. यापैकी आज अर्ज माघारीच्या दिवशी ४१ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले. ग्रामपंचायतींमधील चार हजार ४०२ पैकी ४९१ सदस्य आणि ४७४ सरपंचपदांपैकी संपूर्ण ग्रामपंचायतींची बिनविरोध निवड वगळता इतर ग्रामपंचायतींमधील २३ सरपंचांची निवड बिनविरोध झाली आहे.
दरम्यान, जिल्ह्यात सरपंचपदासाठी आज एक हजार ४५६ उमेदवारांनी एक हजार ४६२ अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे उर्वरित सरपंचपदासाठी आता एक हजार १९३ उमेदवारांचे एक हजार २२४ अर्ज शिल्लक राहिले आहेत. ग्रामपंचायत सदस्यपदासाठी सात हजार ३६२ उमेदवारांनी सात हजार ४४२ अर्ज मागे घेतले. तर, आठ हजार ९९५ उमेदवारांचे नऊ हजार ८३ अर्ज शिल्लक राहिले आहेत. हे सदस्य विविध प्रभागांतून निवडणूक लढवत आहेत.

तालुका* एकूण गावे* सरपंच बिनविरोध* सदस्य बिनविरोध* सरपंचांसह ग्रामपंचायत बिनविरोध
शाहूवाडी*४९*२*उपलब्ध नाही*५
पन्हाळा*५०*१*१३९*१०
हातकणंगले*३९*नाही* नाही* नाही
शिरोळ*१७*१*१८*नाही
करवीर*५३*१*६३*३
गगनबावडा*२१*३* उपलब्ध नाही*३
राधानगरी*६६*१*१२२*८
कागल*२६*नाही*४*नाही
भुदरगड*४३*६* ४२*५
आजरा*३६*नाही*५५*५
गडहिंग्लज*३४*४*४८*नाही
चंदगड*४०*४* उपलब्ध नाही*२
एकूण*४७४*२३*४९१*४१

बिनविरोध झालेली गावे तालुकावार अशी ः
* शाहूवाडी : करुंगळे, बहिरेवाडी, उदगिरी, कोळगाव, सांभू, टेकोली व माणगावमध्ये फक्त सरपंच बिनविरोध. शाहूवाडी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात आला . येळाणे ग्रामपंचायतीत सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. मात्र, या आरक्षणाची व्यक्ती नसल्याने पद रिक्त राहिले.
* पन्हाळा : पिंपळे तर्फे सातवे, मिठारवाडी, शहापूर, कोतोली-माळवाडी, किसरूळ, करंजफेण, आसगाव, गोलीवडे, मानवाड आणि कोलिक. गिरोलीत फक्त सरपंच आणि मोरेवाडी-साळवाडी येथे सदस्य बिनविरोध झाले आहेत.
* हातकणंगले : तालुक्यात एकही ग्रामपंचायत बिनविरोध झालेली नाही.
* शिरोळ : तालुक्यात राजापूरवाडी गावातील सरपंच आणि १८ सदस्य बिनविरोध झाले. मात्र, एकही ग्रामपंचायत बिनविरोध झालेली नाही.
* करवीर : तालुक्यात भाटणवाडी ग्रामपंचायत बिनविरोध; तर कांचनवाडी, वसगडे, कळंबे तर्फे ठाणे येथे सरपंच बिनविरोध.
* गगनबावडा : तालुक्यात कोदे बुद्रुक, अणंदूर, मार्गेवाडी ग्रामपंचायत बिनविरोध. आसळज, वेसर्डे, शेणवडेमध्ये सरपंच बिनविरोध. शेळोशी आणि साळवणमध्ये सदस्य बिनविरोध; तर सरपंचपदासाठी अटीतटीची लढत.
* राधानगरी : तालुक्यात पाटपन्हाळा, सोळांकूर, आपटाळ, केळवशी, बुद्रुक, पडसाळी, माणबेट, ढेंगेवाडी आणि शेळेवाडी ग्रामपंयाती बिनविरोध; तर अडोली येथे सरपंच निवडही बिनविरोध.
* कागल : तालुक्यात मुगळी व हमीदवाडा येथे प्रत्येकी एक सदस्य बिनविरोध आणि व्हनाळी येथे दोन सदस्य बिनविरोध.
* भुदरगड : तालुक्यात अंतुर्ली, करडवाडी, पाल, कोळवण-पाळेवाडी, अनफ खुर्द ग्रामपंचायत बिनविरोध. मानवळेमध्ये सरपंच आणि भाटीवडेमध्ये सर्व सदस्य बिनविरोध.
* आजरा : तालुक्यातील चाफोडी, पोळगाव, लाटगाव, अवंडी व खेडगे पारपोली ग्रामपंचायत बिनविरोध.
* गडहिंग्लज : तालुक्यात बटकणंगले, कौलगे, कडाल आणि कडलगे सरपंच बिनविरोध. हासूर आणि सासगिरीसाठी सदस्यांसाठी निवडणूक होत आहे. वैरागसाठी केवळ सरपंच निवडणूक होत आहे.
* चंदगड : तालुक्यात लकीकट्टे, सातवणे, नागनवाडी व पाटणे येथील सरपंच बिनविरोध.