
आजरा ः ग्रामपंचायत वार्तापत्र
आजरा
रणजित कालेकर
सोयीच्या आघाड्यांवर भर
आजरा, ता. ७ : तालुक्यातील चाफवडे, पोळगाव, लाटगाव, आवंडी व खेडगे-पारपोली या पाच ग्रामपंचायतीच्या बिनविरोध झाल्या आहेत. स्थानिक पातळीवरील राजकारण, भाऊबंदकी, नेत्यांचा इगो हर्ट झाल्याने सहा गावांतील निवडणूक बिनविरोध झाली नाही. या निवडणुकीत पक्ष, गट तटापेक्षा सोयीचे राजकारण व आघाड्या यावर नेतेमंडळीनी भर दिल्याचे दिसते.
तालुक्यातील लोकसंख्येने मोठ्या व राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या सहा गावांची निवडणूक लागल्याने तेथील सामना रंगतदार होणार आहे. उत्तूर ग्रामपंचायतीसाठी पारंपरिक विरोधक एकत्र आल्याने भाजप व अपक्षांनी उचल खाल्ली आहे. भादवण येथे शिवसेनेला रोखण्यासाठी विरोधात अन्य पक्ष गट तटांची युती झाली आहे. बहिरेवाडीत पारंपरिक विरोधकात दुरंगी सामना रंगणार आहे. कोळिंद्रे गावात बिनविरोधाचा प्रयत्न असफल ठरला. मडिलगेत पारंपरिक गटातच सरपंच व सदस्यपदासाठी बहुरंगी लढत होत आहे. गजरगावात सरपंचपदासाठी चौरंगी सामना होणार आहे. स्थानिक नेतेमंडळी व कार्यकर्त्यांनी एकमेका हाथ देऊन अवघे धरू सुपंथ केले आहे.