
दर्जेदार अभिव्यक्तीसाठी समाज माध्यमांचा वापर हवा : जत्राटकर
दर्जेदार अभिव्यक्तीसाठी
समाजमाध्यमांचा वापर हवा : जत्राटकर
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर : दर्जेदार अभिव्यक्तीसाठी समाजमाध्यमांचा प्लॅटफॉर्म वापरावा. उच्च प्रतीचे वैचारिक आदान -प्रदान होऊन समाजमानस घडविणे अगर मतनिर्मिती होण्यासाठी समाजमाध्यमे महत्त्वाची आहेत, असे मत शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण आणि ऑनलाइन शिक्षण केंद्रातर्फे सायबर जागरुकता दिवस कार्यक्रमांतर्गत मराठी विषयाने आयोजित केलेल्या ‘समाजमाध्यमे आणि सायबर सुरक्षा’ या विशेष ऑनलाइन व्याख्यानमालेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उपकुलसचिव डॉ. नीलेश बनसोडे होते. या वेळी डॉ. जत्राटकर म्हणाले, ‘‘समाजमाध्यम योग्य पद्धतीने हाताळण्याचे भान वापरकर्त्यांना असले पाहिजे. नवतंत्रज्ञानाचा हात धरून आलेल्या गेमिंग व अतिरेकी वापरामुळे तरुणांमध्ये हिंसेची तीव्रता वाढली आहे. हे थांबावे. समाजमानस कलुषित करण्यासाठी समाजमाध्यमाचा वापर टाळला पाहिजे.’’ डॉ. बनसोडे म्हणाले, ‘‘आपण सोशल मीडिया वापरताना त्याचा इतरांनी गैरफायदा घेऊ नये, याची काळजी घेतली पाहिजे.’’ या वेळी डॉ. पी. एस. लोंढे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. एस. डी. भोसले यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सी. ए. बंडगर यांनी आभार मानले.