ठसे उमटत नाहीत, म्हणून जीवंत नाही ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठसे उमटत नाहीत, म्हणून जीवंत नाही ?
ठसे उमटत नाहीत, म्हणून जीवंत नाही ?

ठसे उमटत नाहीत, म्हणून जीवंत नाही ?

sakal_logo
By

ठसे उमटत नाहीत म्हणून
आम्ही जिवंत नाही काय?

पेन्शनरांचा सवाल; हयातीच्या दाखल्यासाठी हेलपाटे

लुमाकांत नलवडे ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ ः हाताच्या बोटावरील ठसे उमटत नाहीत म्हणून आम्ही जिवंत नाही काय? असा संतप्त सवाल सेवा केंद्रात आलेल्या ज्येष्ठ नागरिकांतून विचारला जात आहे. माजी सैनिक, ज्येष्ठ नागरिकांसह अनेक बॅंक खातेदारांना डिसेंबरअखेर हयातीचा दाखला द्यावा लागतो. त्यासाठी आवश्‍यक हाताच्या बोटाचे ठसेच स्कॅन होत नाहीत. परिणामी, हयातीचा दाखला मिळण्यावर मर्यादा येतात. ज्येष्ठांचा हा त्रास टाळण्यासाठी सोप्या पद्धतीने दाखला देण्याची व्यवस्था व्हावी अशी अपेक्षा ज्येष्ठ नागरिकांची आहे.
निवृत्ती वेतनाठी बॅंकेत हयातीचा दाखला द्यावा लागतो. यासाठी पूर्वी बॅंकेतच अर्ज भरून घेतला जात होता. हे ‘ऑफलाईन’ होते. त्यामुळे तासाभरात हयातीचा दाखला बॅंकेला मिळत होता. अलीकडेच खासगी एजन्सीजला हे काम दिल्याचे बॅंकेतून सांगण्यात येते. या यंत्रणेतून दाखला मिळविण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या हाताचे ठसे स्कॅन करावे लागतात. त्याशिवाय पुढील प्रक्रिया होत नाही. हाताच्या बोटांवरील रेषा स्कॅनच होत नाही. महिलांचाही तोच अनुभव आहे. त्यामुळे महा-ई-सेवा केंद्राच्या कर्मचाऱ्यांकडून त्यांना व्हॅक्स दिले जाते. हातावर लावून हात चोळा असे सांगितले जाते. त्यानंतर पुन्हा स्कॅन केले जाते. मात्र, अनेक वेळा दिवसभर रांगेत उभे राहून व्हॅक्स लावूनही स्कॅन होत नाही. त्यामुळे उतारवयात हेलपाटे मारावे लागतात. हाताचे ठसे उमटत नाहीत. त्यावेळी डोळ्यांचा पर्याय असतो. मात्र, शहरासह जिल्ह्यात डोळ्यांचे स्कॅन करणारी यंत्रणा मोजकीच आहे. तिही सुस्थितीत असतेच असे नाही.

कोट
आधारकार्ड बायोमेट्रिक करण्याची सुविधा काही बॅंकांमध्येही खासगी ठेकेदारांतर्फे केली आहे. तेथे रोज पंधरा ते वीस व्यक्तींचेच ‘अपडेट’ होऊ शकते. तेथे शासनानेच ठरविलेले १०० रुपये शुल्क आकारले जाते. येथे आधारकार्ड अपडेट केल्यास अडथळ्यांतून मार्ग निघू शकतो.
- राकेश खोत, बॅंकेतील केंद्र प्रमुख