शहर अभियंत्यांनी तयार केली टोळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहर अभियंत्यांनी तयार केली टोळी
शहर अभियंत्यांनी तयार केली टोळी

शहर अभियंत्यांनी तयार केली टोळी

sakal_logo
By

शहर अभियंत्यांनी टोळी तयार केली
कॉंग्रेसच्या माजी नगरसेवकांकडून आरोप; प्रश्‍नांची सरबत्ती

कोल्हापूर, ता. ९ ः शहर अभियंत्यांनी महापालिकेत टोळी तयार केली आहे. त्यांचे दुकान बंद होणार म्हणून त्यांना डांबरी प्लॅंट सुरू करायचा नाही. त्यांच्यामुळे महापालिकेतील सिस्टीम खराब झाली आहे, असा आरोप आज कॉंग्रेस पक्षाचे माजी पदाधिकारी व नगरसेवकांनी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत केला. काहीही होत नाही हे समजल्याने ही टोळी प्रशासकांची दिशाभूल करून फसवणूक करत आहे. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करा, अशी मागणीही केली.
रस्ते कामांबाबत आमदारांनी आढावा बैठक घेतल्या. पण, फरक पडला नसल्याने कॉंग्रेसच्या माजी नगरसेवकांनी आज आक्रमक झाले. वरिष्ठांशी चर्चा केल्याशिवाय जायचे नाही असे ठरवल्याने डॉ. बलकवडे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यामध्ये शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंत्यांवर प्रश्‍नांची सरबत्ती केली. भ्रष्टाचारी कारभार केला जात असल्याचे सांगत खराब रस्त्यांच्या फोटोंचा अल्बम दिला.
कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, अर्जुन माने, दुर्वास कदम, भूपाल शेटे, संजय मोहिते, प्रताप जाधव, भारती पोवार, दीपा मगदूम, माधुरी लाड आदींनी टीकेचा भडिमार केला. पवडी विभागाने केलेले रस्ते चांगले आहेत. पण, ठेकेदारांना रस्त्याची टेंडर देण्यासाठीच अधिकाऱ्यांनी कचरा टाकून प्लॅंट बंद पाडला. त्यासाठी फौजदारी दाखल करा. शहर अभियंता जाणीवपूर्वक सुरू करण्याचे टाळत आहेत. नवीन प्लॅंट होईपर्यंत भाड्याने प्लॅंट घ्या. ठेकेदाराकडून दोनदा रस्ता केला असे अधिकारी सांगतात. हे उपकार नसून शरमेची बाब आहे, असे आरोप केले.
शहर अभियंत्यांना पदावरून दूर करण्याची मागणीही काहींनी केली. रस्ते कामात सुधारणा झाली नाही तर घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला. अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, नारायण भोसले उपस्थित होते.

कोट
शहरात हजारांहून अधिक किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. त्यांच्या देखभालीसाठी ३० ते ४० कोटींचा निधी हवा असताना पॅचवर्कसाठी केवळ ७९ लाखांची कामे केली आहेत. डांबर प्लॅंट दोनवर्षापूर्वीच एकदा सुरू केला होता.त्यात लीचड आल्याने बंद पडला आहे. नवीन प्लॅंट तयार होईपर्यंत दोन दिवसात प्लॅंट भाड्याने घेतला जाईल.
-नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंता

चौकट
‘ठेकेदारांवर अध्यादेशाप्रमाणे कारवाई’
२० नव्हे तर यापेक्षा जास्त रस्ते खराब असल्याचे माजी नगरसेवकांनी सांगितल्याने शनिवार, रविवारी सर्व विभागीय कार्यालयांकडून पाहणी केली जाईल. डांबरीसाठीचे कर्मचारी आणले जातील. ठेकेदारांवर अध्यादेशाप्रमाणे तीनवेळा रस्ते खराब झाल्यानंतर कारवाई केली जात असल्याचे शहर अभियंता सरनोबत यांनी सांगितले.