
आरोग्य, अस्तित्वासाठी वेळेत सावध व्हा
ajr92.jpg
67586
हात्तीवडे (ता. आजरा) ः येथील सरस्वती हायस्कूलमध्ये मार्गदर्शन करताना अनिल चौगुले. या वेळी उपस्थित यू. सी. आमनगी, एस. बी. चव्हाण आदी.
-------------------
आरोग्य, अस्तित्वासाठी वेळेत सावध व्हा
अनिल चौगुले ः हात्तीवडे येथील सरस्वती हायस्कूलमध्ये व्याख्यान
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. ९ ः मानवाचा निसर्गात हस्तक्षेप वाढला आहे. त्यामुळे हवामान बदलासह विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आपले आरोग्य उतम राहण्याबरोबर अस्तित्व टिकवण्यासाठी नवी लढाई लढावी लागेल. मानवाने जीवनशैलीत बदल करून निसर्गाशी मैत्री करावी लागेल. विद्यार्थ्यांनी वेळेत सावध होऊन निसर्ग, पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन निसर्ग मित्र कोल्हापूरचे सदस्य अनिल चौगुले यांनी केले.
स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीनिमित्त जिल्हा प्रशासनाने विविध उपक्रम आयोजित केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सरस्वती हायस्कूल येथे घर तेथे परसबाग, शाळा तेथे वृक्षपेढी आणि गाव तेथे देवराई या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. मुख्याध्यापक यू. सी. आमनगी अध्यक्षस्थानी होते.
श्री. चौगुले म्हणाले, ‘‘मानवाकडून निसर्गाचा ऱ्हास होत आहे. त्याचे परिणाम मानवी जीवनशैली व आरोग्यावर होत आहेत. अन्नसुरक्षा व जलसुरक्षा धोक्यात आली आहे. त्यामुळे पुढील पिढीच्या आरोग्य व अस्तित्वावर प्रश्नचिन्ह तयार झाले आहे. जीवसृष्टीसह आपले अस्तित्व टिकवायचे असेल तर वेळीच सावध होणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याची गरज आहे. सकस व विषमुक्त आहार घेण्यासाठी घरापाठीमागे परसबाग तयार करावी लागेल. यासाठी विविध प्रकारच्या भाज्यांची लागवड करावी लागेल. विविध प्रकारचे दुर्मिळ व आयुर्वेदिक वनस्पतीची पेढी शाळा व परिसरात करावी लागेल. कचऱ्यावर प्रक्रिया करावी लागेल. भारताचे भावी नागरिक म्हणून विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा लागेल.’’
मुख्याध्यापक श्री. आमनगी, सौ. एच. व्ही. चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. पक्षीमित्र दत्ता पाटील, जी. आर. चिगरे, एस. एम. पाटील, एस. बी. राजगोळकर, आर. एम. कांबळे आदी उपस्थित होते. एस. बी. चव्हाण यांनी स्वागत, प्रास्ताविक करून आभार मानले.