
तिरंगी लढतीमुळे साळगावमध्ये चुरस
तिरंगी लढतीमुळे साळगावमध्ये चुरस
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. ९ ः हिरण्यकेशी काठावरील साळगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत तिरंगी लढतीमुळे चुरस आली आहे. युवकांनी तिसरी आघाडी करत निवडणुकीत रंगत भरली आहे.
गावामध्ये स्थानिक नेत्यांनी सोयीच्या आघाड्या केल्याने गतवेळचे मित्र या वेळी विरोधात लढत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीचे राजकीय चित्र यावेळी वेगळे आहे. राष्ट्रवादीचे सुभाष दोरुगडे यांच्यापासून फारकत घेत अरुण गावडे, संदेश लोहार यांनी तिसरी आघाडी केली आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी गटाचे आनंदराव कुंभार यांनी बजरंग पाटील यांच्या गटाशी हातमिळवणी केली आहे. दरवेळेला या ग्रामपंचायतीची निवडणूक पारंपारिक प्रतिस्पर्धी गटात होत होती. यंदा मात्र तरुणाईने तिसरे पॅनेल करून प्रस्थापित गटांना आव्हान दिले आहे. त्यामुळे या निवडणुकीत वेगळी राजकीय समीकरणे तयार झाली आहेत. तीन गटांत जोरदार लढत होणार असल्याने प्रत्येक मताला महत्व आले आहे. त्यामुळे बाहेरगावी तसेच मुंबई व पुण्यात असलेल्या मतदारांना फिक्स करण्यासाठी प्रत्येक गट आतापासून धडपडत आहेत. ही निवडणुक साळगावच्या राजकीय पटलावर परिणाम करणारी ठरणार आहे.